सावकारी कर्ज घेताना कोऱ्या कागदांवर सही करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:42+5:302021-07-15T04:22:42+5:30
चिपळूण : सावकारी कर्जापायी होणारी कर्जदारांची पिळवणूक पाहता पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सावकारी कर्ज घेताना कर्जदाराने कोणत्याही ...
चिपळूण : सावकारी कर्जापायी होणारी कर्जदारांची पिळवणूक पाहता पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सावकारी कर्ज घेताना कर्जदाराने कोणत्याही कोऱ्या कागदपत्रांवर किंवा चेकवर सही करू नये, असे आवाहन करतानाच सावकारांनी कर्जदाराला त्याचा परतफेड अहवाल वेळोवेळी द्यावा. शेती कर्जाला तारण घेता येणार नाही. शासकीय नियमापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करून पिळवणूक केल्यास थेट पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चिपळूणमध्ये सावकारी धंद्याला आलेला ऊत आणि त्या माध्यमातून कर्जदारांची होणारी पिळवणूक, जबरदस्ती, धमक्या, मारहाण, जप्ती असे सावकारीचे बिंग फुटले आहे. याविषयी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी दखल घेत १ जुलै ते १२ जुलै असा सावकारी पिळवणुकीला पायबंद घालण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेतला होता. यामध्ये संबंधित पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांमध्ये सावकारी कर्जबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये नागरिकांना सावकारी कर्जाबाबत शासकीय नियमांची पूर्ण माहिती देण्यात आली. सावकारी कर्जाचे प्रकार किती व कोणते, शासनाने ठरवून दिलेले व्याजदर कसे, अशी अनेक माहिती देतानाच कर्जदाराने कर्ज घेताना कोणतेही कोरे बॉण्ड पेपर, कागद, चेक अशा कागदपत्रावर सही करू नये. कर्ज देणारा परवानाधारक असल्याची खात्री करावी, सावकाराने कर्जदाराला त्याचा परतफेड अहवाल वेळोवेळी द्यावा, शेती कर्जाला कोणतेही तारण ठेवता येणार नाही. मुद्दलापेक्षा जास्त व्याजही आकारता येणार नाही. कोणतीही मालमत्ता किंवा वाहनांची जप्ती करण्याचे अधिकार सावकाराला नाहीत. शासकीय नियमांच्या बाहेर जाऊन जास्त व्याज घेता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करून कोणीही सावकार जर कर्जदारांची पिळवणूक करत असेल तर अशा कर्जदारांची तत्काळ जवळच्या पोलीस स्थानकात किंवा सहायक निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.