घरच्या घरी करा सहा मिनिटे वाॅक टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:37+5:302021-04-21T04:31:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित सुरू आहे ना, हे शोधण्यासाठी सहा मिनिटे चालण्याची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित सुरू आहे ना, हे शोधण्यासाठी सहा मिनिटे चालण्याची चाचणी ही एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे. या चाचणीमुळे रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता शोधण्यास मदत होते, त्यामुळे अशा रुग्णाला वेळीच रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविता येतात.
आपली फुफ्फुसे काम करेनाशी झाली की, आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. मात्र, हे वेळीच लक्षात आले, तर त्यावर लागलीच उपचार करता येतात. कोरोना काळात सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीचा फार उपयोग हाेणार आहे. सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल किंवा १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, त्यापेक्षाही कमी म्हणजे ३ टक्क्यांनी किंवा ९३ पेक्षा कमी झाली, तर मात्र आपल्याला ऑक्सिजन कमी पडतोय, हे लक्षात घेऊन लगेचच डाॅक्टरांकडे जायला हवे.
६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ही चाचणी ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालूनही करू शकतात.
कोणी करायची ही टेस्ट?
ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती, घरगुती विलगीकरणात (होम आयसोलेशन) मध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ही चाचणी करावी.
अशी करा चाचणी
बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा. त्यावर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा, ऑक्सिमीटर तसाच ठेवून सहा मिनिटे घरातल्या घरात मध्यम आणि स्थिर गतीने चाला. सहा मिनिटानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.
...तर घ्या काळजी
रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती, त्यापेक्षा ३ टक्क्यांहून अधिकने कमी कमी होत असेल, सहा मिनिटे चालल्यानंतर धाप लागल्यासारखे होत असेल, तर तर तातडीने डाॅक्टरांना दाखवावे.
सध्या चाचणीसाठी मोठी रांग लागलेली आहे. सगळी रुग्णालये भरलेली आहेत. रुग्णांपैकी ७० टक्के लोक ४५ वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात घरातच राहून सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वांनी घरातच राहून आपण कोरोनापासून सुरक्षित आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरने सहा मिनिटे चालण्याची चाचणी करावी आणि कोविड किंवा अन्य आजार आहेत किंवा नाही, याची माहिती करून घ्यावी.
- लक्ष्मीनारायण मिश्रा,
जिल्हाधिकारी, रत्नागिरी