आता लसीकरणासाठीही रस्त्यावर उतरायचे काय : हनिफ मुसा काझी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:34+5:302021-05-08T04:32:34+5:30
राजापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जनतेला पहाटेपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाकडून लसीकरणाबाबत कोणतेही सुयोग्य असे नियोजन ...
राजापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जनतेला पहाटेपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाकडून लसीकरणाबाबत कोणतेही सुयोग्य असे नियोजन केले जात नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनलाइन नोेंदणीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लस मिळावी यासाठीही आम्ही रस्त्यावर उतरायचे काय? असा प्रश्न राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांनी यापूर्वी लस घेतली आहे, त्यांची ४० ते ४५ दिवसांची मुदत संपून गेली तरी त्यांना लसीचा दुसरा डोस मिळत नाही, अशी तालुक्यात अवस्था आहे. मग त्यांनी काय करायचे, त्यांना लस कधी मिळणार असाही प्रश्न काझी यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात तर सर्वसामान्य जनतेतील अनेकांकडे अॅण्ड्रॉइड मोबाइल नाहीत, मग ते ऑनलाइन नोंदणी कशी करणार, हा एक गंभीर प्रश्न असून जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री, खासदार आणि आमदार याबाबत गांभीर्याने लक्ष देणार आहेत की नाहीत, असेही काझी यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती झाल्याने आता लसीकरणासाठी गर्दी होत आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून त्याची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, ४४ च्या वरील नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी बंद झाली आहे. यापूर्वी अनेक नागरिकांनी रांगा लावून राजापुरात लस घेतली. यात कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता कोविशिल्ड लस आली आहे. मात्र, कोव्हॅक्सिन उपलब्ध होत नाही आणि झालीच तर ती १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदविणाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. मग यापूर्वी ज्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे व त्यांची मुदत संपली आहे, त्यांना कधी लस मिळणार, ज्येष्ठ नागरिकांना सुलभतेने कधी लस मिळणार, असा प्रश्न काझी यांनी उपस्थित केला आहे.