मला मारूनच वाद संपवायचा आहे का, आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल
By संदीप बांद्रे | Published: February 17, 2024 03:17 PM2024-02-17T15:17:18+5:302024-02-17T15:17:36+5:30
चिपळूण : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचे त्यांचे धोरण आहे. ...
चिपळूण : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचे त्यांचे धोरण आहे. तेच निलेश राणेंनी गुहागरच्या सभेत केले. मला मारूनच त्यांना हा वाद संपवायचा आहे का, असा सवाल शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आपल्याला संपवणे तितके सोपे नाही. माझा कार्यकर्ताच छातीचा कोट करून तुमच्याबरोबर संघर्ष करेल हे लक्षात ठेवा. आता जबाबदारी गृहविभागाची व येथील पोलिसांची आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास मी थेट रस्त्यावर उतरून न्याय मागेन, असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.
माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी येथे जोरदार राडा झाला. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव म्हणाले, निलेश राणे हे राडा करण्यासाठीच चिपळूणात आले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या गोष्टी उघड होतील. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या डिकीमध्ये खोके भरून दगडी आणल्या होत्या. मिरवणुकीतील सहभागी लोकही बाहेरगावचे होते. त्यांनीच दगडफेक करायला लावली. गाड्या फोडा असे निलेश राणे स्वतः सांगत होते हे देखील फुटेजमध्ये दिसत आहे. पूर्वनियोजित कट करूनच ते चिपळूणात आल्याचा आरोप जाधव यांनी केला.
प्रत्यक्षात पोलिसांनी महामार्गावर स्वागत करण्याची परवानगी दिलीच कशी आणि कोणत्या नियमाखाली दिली. अनेकवेळा सांगूनही पोलिसांनी माझे ऐकले नाही. हा हल्ला होणार हे पोलिसांना माहीत होते. तरी देखील त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन माझ्याच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. मुदतबाह्य अश्रूधुर असलेल्या नळकांड्या जाणूनबुजून आमच्याच बाजूला फोडल्या. निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना धुमशान घालण्यासाठी मोकळे सोडले. पोलिसांनी जर महामार्गावर परवानगीच दिली नसती किंवा त्यांना थेट सभेच्या ठिकाणी पाठवून दिले असते, तर काहीच घडले नसते. त्यामुळे पोलीस देखील जबाबदार आहेत.
निलेश राणेंच्या सभेबद्दल आमदार जाधव म्हणाले, गुहागर मधील त्यांची सभा बघून लाज वाटली. त्यांच्या प्रत्येक वाक्यात फक्त शिव्या आणि शिव्याच होत्या. आई-बहिनीवरून जाहीर सभेत शिवीगाळ करतात, हीच त्यांची संस्कृती. निलेश राणेंच्या रूपाने भाजपचा खरा चेहरा दिसून लागला असून माजी आमदार विनय नातू यांच्या सारखी व्यक्ती व्यासपीठावर बसून टाळ्या वाजवते. हे देखील तितकेच निंदणीय आहे.
निलेश राणे सभेत सतत मला संपविण्याची भाषा करीत होते. याचाच अर्थ मी जे बोलत होतो की मला धमक्या येत आहेत. ते निलेश राणे यांनी सत्य ठरवले आहे. मला मारण्याची जबाबदारी देखील निलेश राणे यांनी घेतली आहे. हे देखील त्यांनी आपल्या भाषणातुन स्पष्ट केले आहे. पण मला संपवणे तितकेसे सोपे नव्हे. असा पुनरूच्चारही जाधव यांनी केला.