रायपाटण कोविड सेंटरला डॉक्टरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:42+5:302021-04-29T04:23:42+5:30
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे त्या सेंटरमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याची बाब भाजप तालुकाध्यक्ष ...
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे त्या सेंटरमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याची बाब भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या निदर्शनाला आली. त्याबद्दल भाजप तालुकाध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रायपाटणमधील कोविड सेंटरला भेट दिली. सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोणताही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आली.
सदर कोविड सेंटरमध्ये सुमारे ४६ पेशंट दाखल असून, आता सुमारे १० पेशंट भरती केली जाणार आहेत. त्यात एक ८२ वर्षाचे वृद्ध आहेत. मात्र, रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याने रुग्णांची परवड होत असून, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न अभिजित गुरव यांनी विचारला आहे.
डॉक्टरअभावी चालविले जाणारे कोविड सेंटर म्हणजेच सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असा आरोप गुरव यांनी केला आहे.
रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. जर कोविड सेंटरमध्ये डॉक्टरच नसेल तर रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा अट्टाहास कशासाठी व कोणासाठी चालला आहे, हे नेमके कळणे कठीण झाले आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्नही गुरव यांनी विचारला आहे. शासनाने तत्काळ या कोविड सेंटरला अवश्यक असलेले डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही भाजपच्यावतीने करण्यात आली. रायपाटण कोविड सेंटरची ही धक्कादायक स्थिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत रायपाटणचे सरपंच महेंद्र भिकू गांगण, माजी सरपंच राजा नलावडे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश चांदे, प्रसाद पळसुलेदेसाई, यांनी पुढे आणली आहे.
............................
रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरच्या उपस्थितीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, तो सोडविण्यात आला असून बुधवारी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथे आणखी दोन डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आले आहेत. मात्र, ते डॉक्टर अद्यापही या ठिकाणी हजर झालेले नाहीत. ते उपलब्ध झाल्यास तेथील प्रश्न सुटणार आहे.
डॉ. निखिल परांजपे, तालुका वैद्यकीय अधिकारी.