सेवेत असतानाच हृदयविकाराने डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:30 PM2019-05-09T21:30:45+5:302019-05-09T21:34:09+5:30
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. रत्नागिरीत त्यांचे नातेवाईक नसल्याने त्याबाबत तातडीने उस्मानाबाद येथील त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून डॉ. सदाफुले हे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. ते कामावर असतानाच सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागले. त्यामुळे त्यांनी स्वत:हून रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग गाठला. तेथे ते तत्काळ उपचारासाठी दाखल झाले. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.
डॉ. सदाफुले हे याआधीही काहीकाळ जिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात हजर झाले होते. अस्थिरोग विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ज्यांनी त्यांच्याकडून उपचार घेतले, अशा अनेकांशी त्यांचे चांगले संबंध होते. अनेकजण त्यांच्याकडेच अस्थिरोगविषयक आजारांवर उपचारासाठी येत असत.
ज्या रुग्णालयात ते काम करीत होते तेथेच डॉ. सदाफुले यांचा मृत्यू झाल्याने रत्नागिरीतील त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालय आवारात गर्दी केली होती. उपचारावेळी तेथे फिजिशियन असते तर योग्य उपचारांनी त्यांचा प्राण वाचला असता अशी चर्चा सुरू होती.