कोणी लस देता का लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:27+5:302021-05-05T04:52:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लसचा साठा अपुरा असतानाच केंद्र सरकारने आता १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना ...

Does anyone get vaccinated? | कोणी लस देता का लस?

कोणी लस देता का लस?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लसचा साठा अपुरा असतानाच केंद्र सरकारने आता १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला तसेच काहींना दुसरा डोस न मिळाल्याने सध्या या नागरिकांना आपल्याला वेळेवर डोस मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. प्रारंभी आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या फळीतील, पोलीस, महसूल आदींना लसीकरण करण्यात आले. त्यांनतर लसीचा साठा पुरेसा आहे का, हे लक्षात न घेताच शासनाने ४५ वर्षांवरील कोमाॅर्बिड आणि पाठोपाठ ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर सरकसकट ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात केली आहे.

अचानक लसची मागणी वाढली. मात्र, उपलब्धता कमी असल्याने काही जणांचे पहिले डोस झाले आहेत. मात्र, त्यांना दुसरा डोस उपलब्ध नसल्याने नियोजित वेळेत तो उपलब्ध होणे अवघड झाले आहे. तशातच आता शासनाने पुन्हा १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांसाठी माेफत लसची घोषणा केली आहे.

मात्र, आधीच्या वयोगटांतील नागरिकांनाच पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यातच १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण होणार असले तरीही त्यांच्यासाठी येत असलेला लसीचा साठा अपुरा असाच आहे. एकंदरीत, शासनाकडून येत असलेल्या अपुऱ्या लसीमुळे सर्वच वयोगटांना लस कमी पडत आहे.

६० वर्षांवरील

६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त असल्याने या नागरिकांना लस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्राधान्याने लस दिली जात आहे. अशांनी नजीकच्या हॉस्पिटल अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ही लस घ्यावी.

४५ वर्षांवरील

गंभीर स्वरूपाचा तसेच अन्य आजार असलेल्या (कोमाॅर्बिड) ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. अशा नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी.

१८ वर्षांवरील

शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी काेविन पोर्टलवर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करावी. जवळचे केंद्र निवडून लस घेण्याची तारीख निश्चित करूनच लसीकरण केंद्रावर जावे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना लसची गरज आहे. आता तर १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सध्या लसचा तुटवडा आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, या वयोगटाबरोबरच ४५ वर्षांवरील नागरिकांनाही वेळेत लस मिळावी यासाठी मंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे प्रयत्न सुरू आहेत.

- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

सध्या ज्येष्ठांना कोरोना लस मिळणे गरजेचे आहे. आम्ही आता कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहोत. सुरुवातीला शुगरचा त्रास असल्याने डाॅक्टरांनी आधी घेऊ नका, असे सांगितले होते. मात्र, आता पहिलाच डोस मिळत नाही.

- ६० वर्षांवरील नागरिक, रत्नागिरी

पहिला डोस २३ मार्च रोजी घेतला होता. मात्र, आता जवळपास दीड महिना होत आला आहे. लसचा तुटवडा असल्याने दुसरा डोस घेण्यासाठी आता सर्वच केंद्रांवर शोधाशोध सुरू आहे. मात्र, लस आता जिल्ह्यातच उपलब्ध नाही.

- ४५ वर्षांवरील नागरिक, रत्नागिरी

१८ वर्षांवरील लस घेणाऱ्यांसाठी २८ एप्रिलपासून नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, मी गेल्या कित्येक दिवसांपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करत आहे. मात्र, ही नोंदणीच होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे.

- १८ वर्षांवरील नागरिक, रत्नागिरी

Web Title: Does anyone get vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.