कुणी ऑक्सिजन देता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:24+5:302021-05-14T04:30:24+5:30
गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडणे एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी , ...
गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडणे एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी , खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत. जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधयुक्त वनस्पतींची दुर्मीळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. ज्या प्रमाणात जंगलतोड होते, त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे. जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षाअभावी येणारे पूर अशा समस्या जागोजागी भेडसावत आहेत. शिवाय वातावरणातील ऑक्सिजनच्या प्रमाणातही घट होत आहे. अशाही परिस्थितीत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वृक्षतोड राजरोसपणे केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भागातून मुंबई, पुण्यातील कारखाने व स्मशानभूमीसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात लाकूड पुरवले जाते. तेव्हा आताच जागे होण्याची वेळ आहे, अन्यथा खुल्या वातावरणातही ‘कोणी ऑक्सिजन देता का, ऑक्सिजन’ अशी भीक मागायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असेच वाटते आहे.
- संदीप बांद्रे