रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:01 PM2024-07-30T12:01:33+5:302024-07-30T12:02:06+5:30
रत्नागिरीतील महामार्गच का रखडला
रत्नागिरी : कोणत्याही व्यक्तीवर नाही, पण व्यवस्थेवर किंवा विषयावर चर्चा झालीच पाहिजे, ती रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्न माजी खासदार नीलेश राणे यांनी सामंत समर्थकांना केला आहे. रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का, असा प्रश्न करत त्यांनी सामान्य माणसावर हात उगारलेला आपण खपवून घेणार नाही, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
रत्नागिरीतील खड्ड्यांबाबत बोलावण्यात आलेली सभा सामंत समर्थकांनी उधळून लावली. याबाबत नीलेश राणे यांनी समाज माध्यमावरून कडक टीका केली आहे. याबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी सामंत समर्थकांवर टीका करतानाच लोकांच्या प्रश्नांसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.
रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. मात्र, ही सभा होण्यापूर्वीच उधळण्यात आली. मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकावण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून, रत्नागिरीला १९९० मधील बिहार करायचे आहे का, असा प्रश्न राणे यांनी केला आहे.
सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती, त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते. तरीही त्यांना बोलू दिले नाही. सभेत जे ५०-६० जण घुसले त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली काही माणसे होती. अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकावयाचा, त्यांना घाबरावयाचा अधिकार कोणी दिला. यावर पोलीस कोणती कारवाई करणार आहेत, असा प्रश्नही राणे यांनी केला आहे.
रत्नागिरीतील महामार्गच का रखडला
याच सभेत घुसलेल्यांनी महामार्गाचा मुद्दा मांडला. त्याचा समाचार नीलेश राणे यांनी घेतला. महामार्गाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक लावा आणि महामार्गाचा केवळ रत्नागिरीचाच भाग आतापर्यंत अपूर्ण का राहिला याचाही हिशेब द्या. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही, पण आमच्या नेत्यांवर टीका केलीत तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.