चिपळुणात कुत्र्याने केले ११ जणांना जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 06:09 PM2020-10-17T18:09:04+5:302020-10-17T18:09:18+5:30
dogs, chiplun, ratnagirinews चिपळूण शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
चिपळूण : शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव नेहमीचा शिरस्ता राहिला आहे. शहराच्या विविध भागात झुंडीने आढळणारे श्वान काही काळानंतर पिसाळतात आणि समोर असेल त्याला चावा घेऊन जखमी करतात. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे शहरात श्वानांनी अक्षरश: थैमान घातले होते.
शालेय मुलांसह महिला आणि जेष्ठ नागरिकांनाही या श्वानांनी रक्तबंबाळ केले होते. त्यावेळी शहरात मोठी ओरड झाली आणि पालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबवली होती. त्यानंतर शहरात श्वानांचा उपद्रव कमी झाला होता.
शहरात अनेक भागात अक्षरश: झुंडीने श्वान आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी काविळतळी परिसरात अशाच झुंडीतील श्वानाने थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक असे तब्बल ११ लोकांना चावा घेऊन त्याने जखमी केले. हा श्वान इतका जबरदस्त पिसाळलेला होता की, चार चाकी, दुचाकी आणि रिक्षावरदेखील त्याने हल्ला चढवला. नगर परिषदेने अशा श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.