रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांकडून पोलिसांनी करून घेतले घरगुती काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:16 PM2019-06-19T23:16:06+5:302019-06-19T23:16:11+5:30
जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे घरगुती काम करून घेण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
रत्नागिरी : जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे सामान हलवण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. कैद्यांना अशा पद्धतीने घरगुती कामाला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी दिली आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या सुरक्षेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण आठ दिवसांपूर्वी इथून एक कैदी पळून गेला होता आणि आता आज बुधवारी या विशेष कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी घरकामासासाठी जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कारागृहातील एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान ट्रकमध्ये भरण्यासाठी कारागृहातील काही कैदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जेल कर्मचारी वसाहती बाहेर आणले होते. मोकळ्या वातावरणात आलेल्या या कैद्यांना आपण कैदी असल्याचा विसरच पडला होता, तर वर्दीवर असलेले जेल पोलीस मुख्य रस्त्यावर ट्रक उभा करून सहकारी कर्मचाऱ्याच्या घरातील सामान त्या कैद्यांकरवी ट्रक मध्ये भरून घेत असताना अनेकांनी पाहिलं.
आठ दिवसांपूर्वी याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रुपेश कुंभार नामक आरोपी जेल पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेला होता, या प्रकारानंतर जेल मधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, या घटनेला 8 दिवस होत नाहीत तोच एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान हलविण्याकरीता चक्क कारागृहातील कैद्यांचा हमाल म्हणून वापर करण्यात आला, त्यामुळे जेल प्रशासन नेमकं करतंय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक आर आर देशमुख यांनी दिली आहे.