कुणबी नको, मराठा म्हणूनच आरक्षण हवे; रत्नागिरीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्धार
By अरुण आडिवरेकर | Published: November 3, 2023 05:13 PM2023-11-03T17:13:31+5:302023-11-03T17:14:52+5:30
गावा-गावात जाऊन जागृती करणार
रत्नागिरी : आम्हाला कुणबी-मराठा नकाे तर मराठा आरक्षण दिले तरच आरक्षण घेऊ, असा निर्धार रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
रत्नागिरी शहरातील माळनाका येथील मराठा भवन येथे गुरुवारी (२ नाेव्हेंबर) सायंकाळी रत्नागिरी तालुका समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मनाेज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनाला एकमुखाने पाठिंबा देण्यात आला. मात्र, कुणबी मराठा प्रमाणपत्र घेण्यास विराेध दर्शविण्यात आला. समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि त्याची ताकद दाखविण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटना स्थापन करायची का, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी आप्पा देसाई, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, कौस्तुभ सावंत, संतोष सावंत उपस्थित होते.
संघटना स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत गावा-गावात जाऊन जागृती करण्याचे ठरविण्यात आले.
सुधीर भोसले यांनी मराठा आरक्षण का हवे, यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकमताने पाठिंबा दर्शविण्यात आला. परंतु, मराठा-कुणबी प्रमाणपत्र घेण्यास या बैठकीत विरोध करण्यात आला. ९६ कुळी मराठा आहोत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. कुणबी मराठा असे आरक्षण नकाे तर मराठा म्हणूनच आरक्षण हवे, असेही यावेळी ठरविण्यात आले.