दाऊदच्या बागेतील आंब्यांचे दान, सर्वसामान्यांना मोफत टाकले वाटून
By अरुण आडिवरेकर | Published: June 4, 2023 04:17 PM2023-06-04T16:17:03+5:302023-06-04T16:17:18+5:30
सर्वसामान्य लोकांना आंब्यांची चव चाखता यावी, यासाठी जागेचे नवे मालक ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांचा उपक्रम
लाेकमत न्यूज नेटवर्क, खेड: तालुक्यातील मुंबके येथील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या लिलावातून विकत घेतलेल्या आंब्याच्या बागेतील आंबे जागा मालकांनी सर्वसामान्यांना मोफत वाटून टाकले. बागेतील उत्पन्न आपल्यासाठी न घेता सर्वसामान्य लोकांना त्या आंब्यांची चव चाखता यावी, यासाठी या जागेचे नवे मालक ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांनी लिलावात घेतलेल्या बागेतील आंबे काढून सर्वसामान्य व्यक्तींना भेट दिले आहेत.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची खेड तालुक्यातील मुंबके गावातील मालमत्तेचा केंद्र सरकारने लिलाव केला होता. दिल्ली येथील ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांनी ही मालमत्ता लिलावात विकत घेतली होती. या स्थावर मालमत्तेत मुंबके गावात एका आंब्याच्या बागेचा समावेश होता. या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना लागलेले आंबे यावर्षी पहिल्यांदाच चक्क अनेकांना फुकट वाटण्यात आले. ही मालमत्ता आणि आंब्याची बाग पैसे कमावण्यासाठी घेतली नाही, तर चुकीचे काम करणाऱ्याला कायद्याचा वचक बसावा, यासाठी ही मालमत्ता आपण लिलावात घेतली असल्याचे ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून १० नोव्हेंबर २०२० रोजी दाऊद इब्राहिमच्या खेड तालुक्यातील एकूण सात मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. यामध्ये मुंबके गावातील सहा तर लोटे येथील एका भूखंडाचा समावेश होता.