निष्काळजीपणा नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:21+5:302021-07-20T04:22:21+5:30

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ...

Don't be careless ... | निष्काळजीपणा नको...

निष्काळजीपणा नको...

Next

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळत आहेत. तर काही ठिकाणी आजार कोणताही असला तरी काही डॉक्टरही रुग्णांना तपासणीसाठी नकार दर्शवीत असल्याने अखेर जिल्ह्याबाहेर किंवा शहरातील डॉक्टरांकडे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. यामध्ये वेळही जातो, शिवाय नातेवाइकांचा मनस्तापही वाढत आहे. एकूणच विविध घटकांना कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. कोरोनाची वाढलेली भीती, गैरसमज यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी प्रबोधन होणेही गरजेचे आहे. त्यासाठी कोणी पुढे यावे, यापेक्षा गावपातळीवरच जनतेमध्ये जागृतता आणणे गरजेचे आहे. गैरसमज दूर करून आरोग्य सुरक्षा व घ्यावयाची खबरदारी, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अर्थात प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून त्याबाबत निव्वळ प्रबोधनाचे चार शब्द ऐकण्याऐवजी स्वत:मध्ये बदल घडवून आणणे रास्त ठरेल. आपल्यामुळे कुटुंबीय, समाज, गावाला वेठीला धरायला लावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्य सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एकीकडे सर्व व्यवहार सुरू होण्याबाबत आग्रही भूमिका तर दुसरीकडे कोरोना संपला पाहिजे, अशी अपेक्षा याची सांगड घालताना, आरोग्य सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. बाजारातील गर्दीद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. तर काही ‘अति शहाणी’ मंडळी तर विनामास्क मस्त फिरत असतात. याबाबत अजून किती जागृतता हवी आहे? प्राथमिक स्तरावरील खबरदारी घेतली तर नक्कीच याचा फायदा होईल. विविध यंत्रणा कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने साथ देणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कित्येक दुचाकीस्वार आजही रस्त्यावरून येता-जाता बिनधास्त थुंकत असतात. एकीकडे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळी धडपडत असतानाच दुसरीकडे मात्र निष्काळजी मंडळींचा त्रास अन्य लोकांना होत आहे. कोरोनामुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. व्यवहारांची घडी सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. याची जाण असताना जाणूनबुजून दुर्लक्ष का करावे? एखाद्या विषयाची माहिती नसताना गैरसमज करून घेण्यापेक्षा, परिस्थती पाहून तरी स्वत:मध्ये बदल घडविणे काळाची गरज बनली आहे.

मेहरून नाकाडे

Web Title: Don't be careless ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.