काेराेनाला राेखण्याच्या कार्यवाहीत हलगर्जीपणा करू नका : याेगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:51+5:302021-06-05T04:23:51+5:30
मंंडणगड : तालुक्यात एकाच दिवशी १७८ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आराेग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. तालुक्यातील वाढत्या ...
मंंडणगड : तालुक्यात एकाच दिवशी १७८ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आराेग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येची आमदार याेगेश कदम यांनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काेराेनाचा संसर्ग राेखण्याच्या कार्यवाहीत काेणताही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना दिल्या.
तालुक्यातील वाढत्या संसर्गाची कारणे, संसर्ग थोपविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि त्यादृष्टीने कोणती पावले उचलावीत, याबाबतचा आढावा याेगेश कदम यांनी यावेळी घेतला. विषाणू संसर्गासंदर्भातील उपाययोजनांबाबत तत्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी सूचना दिली़ तसेच काेराेनाग्रस्त रुग्णांना कुठे विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे, जे रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही, त्यासंबंधी नियोजन कसे करण्यात आले आहे, या सर्व बाबींचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासोबत त्यांनी चर्चा केली आणि रुग्णांमध्ये वाढ न होता, वेळच्या वेळी उपचार होऊन कोरोना संसर्ग कसा थांबवता येऊ शकतो, याबाबत चर्चा केली.
यावेळी मंडणगड तालुक्याचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, अनंत लाखण, पंचायत समिती सदस्य आदेश केणे, संदेश चिले, मंडणगडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पितळे, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष शिरसे, डॉ. संस्कृती राठोड, उपशहरप्रमुख नीलेश गोवळे, युवा सेना शहर अधिकारी शिवप्रसाद कामेरीकर, पर्यवेक्षक तातू पारधे, कक्षसेवक दीपक राठोड उपस्थित होते.
--------------------------------
मंडणगडातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत आमदार याेगेश कदम यांनी शुक्रवारी आराेग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.