आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:32+5:302021-04-13T04:30:32+5:30
मंडणगड : दाेन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सुरू झालेली दुकाने प्रशासनाने बंद करायला लावल्यामुळे नाराज झालेल्या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे आपल्या ...
मंडणगड : दाेन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सुरू झालेली दुकाने प्रशासनाने बंद करायला
लावल्यामुळे नाराज झालेल्या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे आपल्या व्यथा मांडल्या. गतवर्षीचे लाॅकडाऊन आणि चक्रीवादळामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांनी आता ‘आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका’, असे प्रशासनाला सांगितले आहे.
गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होता. त्यानंतर
तालुक्यात आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्याचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे.
वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या दुकानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आजपर्यंत कमावलेली पुंजी खर्च करावी लागली. शासनाने दिलेली मदतही अपुरी पडली आहे. आधी असलेले दोन महिन्यांचे लॉकडाऊन आणि त्यात आलेलं
चक्रीवादळाचे संकट यामधून व्यावसायिकांची कंबर साफ मोडली आहे. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. चक्रीवादळाच्या
पार्श्वभूमीवर शासनाने कुठल्याही प्रकारे कर्जमाफी केली नाही किंवा वीज बिलामध्ये कुठेही कमतरता केलेली नाही. गेल्या वर्षभरातील वीज बिले आणि कर्जाचे हप्ते जेमतेम भरून व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली असतानाच पुन्हा एकदा शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे तालुक्यातील व्यापारी अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत
मंडणगड तालुक्यात रुग्णसंख्या कमी असूनही तालुक्यातील व्यावसायिक व जनतेने शासनाच्या नियमाप्रमाणे कडक लॉकडाऊन गतवर्षी सांभाळला होता. त्यानंतर
आलेल्या वादळामुळे तालुक्यातील जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याच दरम्यान तालुक्यातील चाकरमान्यांचे मुंबईसारख्या शहरात असलेले नोकरी-व्यवसायही बंद पडल्यामुळे तालुक्यातील आर्थिक स्थिती विस्कटलेली आहे. तालुक्यात रोजगाराचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध
नसल्याने तालुक्यातील जनतेची आर्थिक स्थिती फार बिकट बनली आहे. गतवर्षी लॉकडाऊनला तालुक्यातील व्यावसायिकांनी यशस्वीपणे सहकार्य केले. मात्र, यावर्षी तालुक्यातील आलेल्या एकंदरीत नैसर्गिक संकटामुळे येथील व्यापाऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. या वेळेला प्रशासनाने व्यावसायिकांची बाजू लक्षात घेऊन नियम व अटींची शिथिलता
करून तालुक्यातील व्यवसाय सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.