आमिषाला बळी पडून कवडीमोल दराने जमीन विकू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:59+5:302021-08-27T04:34:59+5:30
खेड : तालुक्यातील जमिनींना सोन्याहून जास्त भाव मिळत आहे. मात्र, याचाच फायदा अनेक दलाल घेत असून, शेतकऱ्यांना फसवून जमिनी ...
खेड : तालुक्यातील जमिनींना सोन्याहून जास्त भाव मिळत आहे. मात्र, याचाच फायदा अनेक दलाल घेत असून, शेतकऱ्यांना फसवून जमिनी कमी किमतीने विकत घेत बळकावण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने जमिनी विकू नये, असे आवाहन रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी केले आहे.
तालुक्यातील लोटे परिसराचा औद्योगिक विकास वेगाने होत आहे. याचाच फायदा काही शासकीय अधिकारी व ठेकेदार घेत आहेत. लोटे, आवाशी, बोरज परिसरातील जमीन कमीत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी येथील स्थानिक दलालांवर जबाबदारी सोपवली जात आहे. यामुळे परिसरातील जमिनी खरेदीसाठी दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यामध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
भविष्यात या जमिनींना सोन्याचा भाव मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बोगस आमिषाला बळी न पडता कमी भावात जमिनी विकू नयेत. या परिसरात प्रतिगुंठा ४ ते ५ लाख असताना दलाल प्रतिगुंठा अवघे २ लाख रुपयांचा भाव देऊन जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी या आमिषाला बळी न पडता फसवणुकीपासून सावध रहावे, असेही सकपाळ यांनी सूचित केले आहे.