रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती नको : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 01:29 PM2022-04-02T13:29:41+5:302022-04-02T13:30:24+5:30

पुण्याप्रमाणे रत्नागिरी शहरातील नागरिकांनीही हेल्मेट वापरू नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Don't force helmet in Ratnagiri city says Uday Samant | रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती नको : उदय सामंत

रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती नको : उदय सामंत

Next

रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. याबाबत ४ एप्रिलपर्यंत परिपत्रक निघाले नाही तर पुण्याप्रमाणे रत्नागिरी शहरातील नागरिकांनीही हेल्मेट वापरू नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त हाेत आहे. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी करुन जनतेची लुबाडणूक केली जात असल्याचा आराेप करण्यात येत आहे. याबाबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन भूमिका मांडली हाेती. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.  पाटील,  उपप्रादेशिक अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री सामंत यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रत्नागिरीतही निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी शहरात हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करताना हेल्मेट सक्ती करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ४ तारखेपर्यंत परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन करावे, असेही त्यांनी आदेश दिले आहेत.

राज्याच्या एका जिल्ह्यात जिल्हाधिकारी असा निर्णय घेऊ शकतात आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे त्या शहरात असा निर्णय हाेऊ शकताे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा निर्णय हाेऊ शकताे, असे मंत्री सामंत म्हणाले.

पुण्यासारखे परिपत्रक काढून नागरिकांचे प्रबाेधन करण्यात येईल व सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री म्हणून मी सूचना दिलेल्या आहेत. याचे पालन झाले नाही तर याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. राज्यातील एका जिल्ह्यात हेल्मेट मुक्ती मिळत असताना अधिकारी जाणीवपूर्वक रत्नागिरीतील लाेकांना त्रास देण्यासंदर्भात असा निर्णय घेत असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली जाईल, असेही मंत्री सामंत म्हणाले.

Web Title: Don't force helmet in Ratnagiri city says Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.