धीर सोडू नका हळूहळू सुरळीत होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:08+5:302021-07-30T04:33:08+5:30
चिपळूण : शहरातील महापुराच्या पार्श्वभूमीवर रोज अनेक व्हीआयपी चिपळूणचा दौरा करत आहेत. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही चिपळूणला भेट ...
चिपळूण : शहरातील महापुराच्या पार्श्वभूमीवर रोज अनेक व्हीआयपी चिपळूणचा दौरा करत आहेत. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही चिपळूणला भेट दिली. यावेळी शहरातील भोगाळे परिसरात २४ तास पाण्यात मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या सुरेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांची कैफियत ऐकून घेतली व त्या ढसाढसा रडल्या. त्यांना अश्रू अनावर झाले आणि धीर सोडू नका हळूहळू सगळे स्थिरस्थावर होईल, असा विश्वास दिला.
पूरग्रस्त चिपळूणची पाहणी व मदतकार्यासाठी उर्मिला मातोंडकर येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त शिंदे कुटुंबाला भेट दिली आणि आर्थिक मदतदेखील केली. त्यावेळी पूरग्रस्त शिंदे कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनादेखील अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, ‘धीर सोडू नका हळूहळू सुरळीत होईल. सगळीकडे धीर सुटेल, अशीच अवस्था आहे. पण देवाने तुम्हाला वाचवले आहे तर आता पुढचीदेखील व्यवस्था होईल. मदत मिळेल. अजून मी नेता नाही पण तुम्हाला यापुढील काळातदेखील मदत करेन मात्र धीर सोडू नका सगळे सुरळीत होईल’, असा विश्वास दिला. यावेळी त्या पायवाटेने चालत शिंदे यांच्या घरापर्यंत गेल्या. शहर बाजारपेठेतदेखील त्यांनी पाहणी करून व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या.