दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी अजिबात घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:07+5:302021-05-06T04:34:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच परिचारिका यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या फळीतील पोलीस, महसूल आदी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून कोमाॅर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, लसचा अपुरा साठा असतानाही आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना आपल्याला दुसरा डोस मिळेल ना, ही चिंता मोठ्या प्रमाणावर लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरक्षा कवच म्हणून लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आता लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, सध्या लसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.
त्यातच आता केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस थांबविण्यात आला असून दुसरा डोस घेणाऱ्यांनाही सध्या डोस मिळेनासा झाला आहे.
राज्यात कोरोना लसचा पुरवठा कमी असल्याने आता दुसरा डोस घेणाऱ्यांना आपला दुसरा डोस वेळेत मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी वेळ लागला तरी घाबरू नका, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
पूर्वी पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी, असे म्हटले जात होते. मात्र, पहिली लस घेतल्यानंतर किमान १४ दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात ॲंटिबाॅडिज निर्माण होतात. त्यामुळे आता दोन लसीमधील कालावधी वाढविण्यात आला आहे. लसीचा प्रभाव वाढण्यासाठी दोन लसीमध्ये अगदी सहा आठवड्यांचा किंवा दोन महिन्यांचा कालावधी जरी गेला तरीही घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केली आहे.
दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा
राज्यात लसचा अपुरा साठा सध्या असला तरी थोड्याच दिवसांत आणखी लस जिल्ह्यासाठीही उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या डोससाठी आठवडाभरात पुरेशी लस येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.