तरुणांची डोकी भडकावू नका, त्यांच्या हाताला काम द्या : अरविंद लांजेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:34 AM2021-08-28T04:34:38+5:302021-08-28T04:34:38+5:30
राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. ...
राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांनी जन आशीर्वाद यात्रेचे बॅनर फाडून एक नवीन पायंडा घालून दिला आहे. तरुणांची डाेकी भडकावण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या, असा सल्ला राजापूर तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.
अरविंद लांजेकर प्रसार माध्यमांशी बाेलताना ते पुढे म्हणाले की, देशात, राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी राजापूर तालुक्याने नेहमीचे शांततेची परंपरा राखलेली आहे. शांत राजापुरात अनेक राजकीय सभा, अनेक सामाजिक राजकीय तसेच वैयक्तिक आजपर्यंत होत होते. पण असे प्रकार केव्हाच होत नव्हते. बॅनर फाडणे, झेंडे काढणे असे समाजकंटकासारखे आपल्या संस्कृतीत न बसणारे काम कोणीही करत नव्हते. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यक्रम आनंदाने जो तो करत होते. मात्र, मंत्री नारायण राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीत जाऊन तेथे एक- दोन बॅनर फाडून सोशल मीडियावर व्हायरल करून अनेकांना अशा घटना करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच राजापुरातही त्याचे पडसाद उमटल्याचे लांजेकर म्हणाले. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले. याला राजापूरचे आमदार राजन साळवी हेच जबाबदार असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याऐवजी अशा कृतीतून भडकावण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे शांत राजापूरच्या शांततेच्या परंपरेला गालबोट लागले. एका लोकप्रतिनिधींकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.
लांजेकर पुढे म्हणाले की, राजापूर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, आरोग्य सुविधांची वानवा, विकास कामांच्या नावाने बोंब अशी परिस्थिती आहे. तरुण मंडळींना आजपर्यंत रोजगार न देता किंवा रोजगार न आणता किंवा एखादा प्रकल्प, उद्योगधंदा न आणता कोणतेही विधायक काम न करता एखादे हॉस्पिटल न आणता, असे नको ते वादग्रस्त उद्योग तरुण मंडळींना करण्यास भाग पाडले. या गोष्टीचा राजापूर मतदारसंघात निषेध व्हायला सुरुवात झाली. या लोकप्रतिनिधीने राजापूरसाठी काही न केलेल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी असे प्रकार करून तरुण मंडळींची माथी भडकवून हाती दगड देऊन अशा लोकप्रतिनिधींनी तरुण मंडळींसाठी किती उद्योग आणले, किती जणांना रोजगार दिला, किती जणांना नोकऱ्या लावल्या, हे विचारणे गरजेचे आहे, असेही लांजेकर यांनी म्हटले आहे.