शिक्षणाची दारे उघडतायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:34+5:302021-09-27T04:34:34+5:30
शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. ...
शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश राजेशिर्के या विद्यार्थ्याने लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत २३६ वी रॅंक प्राप्त केली आहे, ही खरंच काैतुकास्पद बाब आहे. काेराेना काळात शाळा बंद असूनही शिक्षण अजून थांबलेले नाही, हे मात्र नक्की आहे. प्रथमेशच्या रूपाने शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक संधी मुलांसमाेर उघड झाली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रथमेशने आयएएस अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्याने ध्येय्याने तिथपर्यंत मजल मारली. यापूर्वी २००५ मध्ये संगमेश्वर येथील डाॅ. अश्विनी जाेशी या आयएएस झाल्या आहेत. तर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांनी आपला झेंडा राेवला आहे. जिल्ह्यातील युवकांनी केलेली ही कामगिरी निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘नररत्नांची खाण’ म्हणून ज्या रत्नागिरीचा उल्लेख केला जात आहे. ती रत्नागिरी शैक्षणिक वाटचालीतही दैदीप्यमान कामगिरी करत आहे. जिल्ह्याची ही शैक्षणिक वाटचाल अधिक गतिमान हाेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतला आहे, ही बाबही अधाेरेखित करणे गरजेचे आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात ‘रत्नागिरी शैक्षणिक हब’ बनविण्याचा त्यांनी मानस धरला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची मुहूर्तमेढ त्यांनी रत्नागिरीत राेवली आहे. आता पीपीई माॅडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबराेबर जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देशातले पहिले रिसर्च सेंटर उभारण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. मुलांना स्कील डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आयसीडीसीची शाखाही रत्नागिरीत उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत काेराेनानंतर शाळांची दारे उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची आणखी नवनवीन दालने उघडत आहेत. या दालनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाऊल टाकून त्यात यशस्वीतेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक जिद्दीची जाेड हवी आणि या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळही हवे.
- अरुण आडिवरेकर