डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी १३२ वर्षात प्रथमच शासकीय जयंती
By अरुण आडिवरेकर | Published: April 14, 2023 02:27 PM2023-04-14T14:27:56+5:302023-04-14T14:28:07+5:30
आंबडवे येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
अरुण आडिवरेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, मंडणगड: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती त्यांचे मूळगाव आंबडवे (ता. मंडणगड) येथे शुक्रवारी (१४ एप्रिल) साजरी करण्यात आली. तब्बल १३२ वर्षात प्रथमच त्यांच्या मूळगावी शासकीय जयंती साजरी करण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रथमच शासकीय यंत्रणेमार्फत जयंती साजरी केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लाेटला हाेता. पालकमंत्री उदय सामंत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी आमदार याेगेश कदम, सुदर्शन सकपाळ, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह समाजबांधव उपस्थित हाेते.
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आंबडवे गावात शासकीय साजरी हाेत असल्याचा पालकमंत्री म्हणून मला समाधान आहे. आमदार याेगेश कदम आणि मी गतवर्षी याठिकाणी शासकीय जयंती साजरी झाली पाहिजे, असा निर्णय घेतला हाेता. हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आहे. याठिकाणी शासकीय यंत्रणेने सर्व समारंभ साजरे केले पाहिजेत, असे ठरविले हाेते. त्यात आम्हाला यश आले आहे. पहिल्यांदाच याठिकाणी आपण शासकीय जयंती साजरी करताेय, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
याठिकाणच्या स्मारकाचा प्रश्न आहे. स्मारकाचा आराखडा तयार हाेताेय. सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री यांनी आमदार याेगेश कदम यांच्या पाठपुराव्याने अनेक संकल्प याठिकाणी केले आहेत. याठिकाणी काही जागेचे प्रश्न आहेत. त्याबाबत बैठक लावून तेही आपण साेडविणार आहाेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आज लाेकांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागत ही माेहीमदेखील आपल्याला उघडणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्याच लाेकांचे सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.