धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

By admin | Published: March 30, 2016 10:30 PM2016-03-30T22:30:22+5:302016-03-30T23:59:42+5:30

रत्नागिरी एमआयडीसी : अनेक नळपाणी योजनांचे भवितव्य निसर्गाच्या हाती...

Drainage evaporation plant | धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

Next

 रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरातील सात ग्रामपंचायतींना पूर्णत: आणि नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाचपैकी घाटीवळे धरणातील पाणी आटले आहे, तर नादुरुस्तीमुळे असोडे धरणात पाणीसाठा अल्प आहे. उर्वरित तीन धरणात जूनच्या पूर्वार्धापर्यंत पुरेलएवढा साठा असला तरी वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात सापडल्यास या सर्व ग्रामपंचायतींना टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचा पारा ३६ अंशांच्यावर गेला आहे. पारा उतरत नसल्याने तापमानातील वाढ स्थिर आहे. उन्हामुळे काहिली होत असताना धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. तापमान असेच वाढत राहिले, तर बाष्पीभवनाच्या संकटात पाणीसाठा सापडेल व टंचाई अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे मिरजोळे औद्योगिक क्षेत्रासह मिरजोळे गाव, कुवारबाव, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिऱ्या, शिरगाव या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेला दररोज १५०० घनमीटर पाणीपुरवठा होतो. या ७ ग्रामपंचायती एमआयडीसीच्या पाण्यावर पूर्णत: अवलंबूून आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी साठ्यात कपात झाली की, वितरणात कपात करणे भाग पडते. तशी शक्यता सध्यातरी दिसून येत नाही, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, तापमानातील वाढ अशीच राहिली वा त्यापेक्षा वाढ झाली तर बाष्पीभवनाचे संकट निर्माण होण्याची भीती आहे.
सन २०१३मध्ये एमआयडीसीच्या धरणांतील पाणीसाठाच मार्चमध्ये संपला होता. त्यामुळे या सातही ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर विपरित परिणाम झाला होता. कुवारबावमध्ये तर आठवड्याने नळाला पाणी सोडले जात होते. २०१४मध्येही कुवारबावमध्ये जलवाहिनी फुटल्याने व ती दुरुस्त करण्यात १५ दिवस वाया गेल्याने कुवारबाववासीयांची पाण्यासाठी फरपट झाली होती. २०१५मध्ये तसा त्रास झाला नाही. मात्र, यावर्षी घाटीवळे धरणातील पाणीसाठा संपला आहे. असोडे धरण बऱ्याच काळापासून नादुरुस्त आहे. त्याची डागडुजी केलेली नाही. या धरणाची डागडुजी झाली असती तर त्यात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला असता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या धरणात पाणीसाठा अल्प आहे.
आंजणारी, निवसर व हरचेरी या तीन कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हा साठा येत्या जून मध्यापर्यंत पुरेल असा एमआयडीसीचा अंदाज आहे. मात्र तापमानातील वाढ कशी राहणार यावर धरणांमधील पाणी साठ्याची पातळी अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)

पाणी अडवण्यासाठी एमआयडीसीने बांधलेले हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे जुने आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते बांधण्यात आले होते. हरचेरी १९७२, निवसर १९९५, असोडे १९८२, अंजणारी २००१, घाटीवळे १९९२ या साली उभारलेले ्रबंधारे आहेत. त्यांची दुरुस्ती व देखभालही करावी लागते.

Web Title: Drainage evaporation plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.