माखजन - धामापूर मार्गावरील रामनवाडी येथे मोरी खचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:39+5:302021-07-16T04:22:39+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन - धामापूर मार्गावरील रामनवाडी येथील जांगलदेव मंदिराजवळील मोरी खचल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन - धामापूर मार्गावरील रामनवाडी येथील जांगलदेव मंदिराजवळील मोरी खचल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. येथील मोरी खचल्याचे समजताच मावळंगेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन अपघाताची घटना घडू नये, म्हणून वाहनधारकांना सावध करण्यासाठी दगड ठेवले आहेत.
दोन वर्षांपूर्वीही येथील मोरी खचली होती. मात्र, बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करत आजचे काम उद्यावर ढकलले होते. तसेच अनेकदा याबाबत ग्रामस्थांसह वाहनधारकांनी आवाज उठवला होता. मात्र, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने ही मोरी अधिकच खचली असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती बांधकाम विभागाने करावी, अशी मागणी मावळंगेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी केली आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना केव्हा जाग येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
150721\img-20210712-wa0220.jpg
मावळंगे शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते बाबू मोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सावधानतेसाठी दगड ठेवला.