रत्नागिरी विसर्जन मार्गावर गटाराचे सांडपाणी

By admin | Published: September 1, 2014 09:51 PM2014-09-01T21:51:09+5:302014-09-01T23:56:23+5:30

रत्नागिरी पालिका : पावसाळापूर्व कामाची ऐशी की तैशी

Drainage sewage on Ratnagiri immersion road | रत्नागिरी विसर्जन मार्गावर गटाराचे सांडपाणी

रत्नागिरी विसर्जन मार्गावर गटाराचे सांडपाणी

Next

उमेश पाटणकर - रत्नागिरी --पाच दिवसांच्या बाप्पांचे उद्या (मंगळवारी) विसर्जन होत आहे. यानिमित्त रत्नागिरीच्या मांडवी किनारी विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगणार आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून गणेशाची विसर्जन मिरवणूक जाणार असून, ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
गणेश विसर्जन अवघ्या काही दिवसांवर आले असताना गणेशभक्त आणि गणेशाला रत्नागिरी पालिकेने पावसाळापूर्व कामाच्या केलेल्या या ओंगळवाण्या कामाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. रस्त्यावरील खड्डे हा विषय रत्नागिरीत ऐरणीवर आला असतानाच आता या रस्त्याशेजारी असलेली गटारेही सांडपाणी रस्त्यावर सोडून दुर्गंधी पसरवत आहेत. विशेष म्हणजे येथील नगर पालिकेचा गणपती याच रस्त्यावरून जात असताना पालिका ढिम्म का? असा सवाल होत आहे. विसर्जन मार्गावरील गटारांची दुरवस्था झाल्याने गणेशभक्तांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. खुद्द मांडवी किनारी असणारा हायमास्ट वगळला तर जेट्टीवरील प्रकाश व्यवस्था पूर्ण मोडकळीस आली आहे.रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे मिरजोळे येथील अनेक गणेशभक्त ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी मांडवी चौपाटीला प्राधान्य देत असतात. यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ मिरवणुकीमुळे गजबजून जाते. रामनाका - तेलीआळी नाका- रहाटाघरमार्गे भुतेनाका मांडवी हा पर्यायी ८० फुटी रस्ता असला तरी विघ्नहर्त्याची विसर्जन मिरवणूक गोखले नाका, काँग्रेस भुवनमार्गेच जात असते. मार्गावरील संजीवनी हॉस्पिटलसमोर महावितरणच्या विद्युत जनित्रालगत असणाऱ्या गटारावरील झडपा गायब आहेत. यासोबतच मुरलीधर मंदिर नाका आणि मांडवीनाका येथेही गटारांवरील झडपा बसवण्याची गरज आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेला एखादा गणेशभक्त अशा ठिकाणी गटारात कोसळून गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे. भुतेनाका येथील लोखंडी जाळी वाहनांच्या वर्दळीने वाकली असल्याने येथेही गणेशभक्त जखमी होण्याची शक्यता आहे. कित्ते भंडारी हॉलसमोरील भूमिगत गटार तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरुनच वाहात आहे.
प्रत्यक्ष मांडवी धक्क्याची दुरवस्था झाली असून, संरक्षक कठडे आता घातपाती कठडे बनले आहेत. जेटीवरील रेलिंगचे लोखंडी पाईप गंजून गायब झाले असून, अद्याप त्याची दुरुस्ती केलेली नाही. गणेश विसर्जन सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात या जेटीवर गर्दी होत असते. रेलिंग नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्दैवी प्रसंग घडण्याची दाट शक्यता आहे. जेटीवर उभारलेली प्रकाश व्यवस्थेची संपूर्ण यंत्रणा वाऱ्याच्या वेगाने आणि खाऱ्या हवेने पूर्णत: निकामी झाली आहे. गणपती विसर्जनानंतर मांडवी येथून माघारी येणारी वाहने ८० फुटी मार्गाने परत जातात. मात्र, भुतेनाका ते रहाटाघर बसस्थानक दरम्यान असणाऱ्या वळणावर पावसाचे पाणी साठून राहिले आहे. बाजूलाच असलेल्या गटारातील पाणी येथे साठत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या उंचीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेच्या मार्गाने आपली वाहने काढत असतात. विसर्जनाच्या रात्रीही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक कोंडी होऊन अपघातात वाढ होणार आहे.

Web Title: Drainage sewage on Ratnagiri immersion road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.