हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न बुडाले दाभोळ खाडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:25 PM2019-02-08T16:25:33+5:302019-02-08T16:27:28+5:30
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली आहे. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे.
गुहागर : पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली आहे. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे.
लक्षावधी रुपये खर्च करुन तयार केलेली बोट पाण्यात बुडाल्याचे गांभीर्य पर्यटन महामंडळाला नाही, अशी अवस्था आहे. हाऊसबोटीच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या दाभोळवासीयांना पडला आहे. दाभोळ येथे सुवर्णदुर्ग शिपिंंग कार्पोरेशनलगत पर्यटन महामंडळाच्या मालकीची हाऊसबोट गेले काही महिने उभी आहे. या बोटीची देखभाल न केल्याने पाणीउपसा करणारा पंप बंद पडला.
त्यामुळे तळातून बोटीत पाणी जावू लागले. परिणामी गेले दोन महिने ही बोट कलंडलेल्या स्थितीत दाभोळ खाडीकिनारी उभी आहे.
भरतीचे पाणी या बोटीत जात असल्याने हाऊसबोट सुरू होण्यापूर्वीच तिच्या देखभालीचा खर्च करण्याची वेळ पर्यटन महामंडळावर आली आहे. यासंदर्भात पर्यटन महामंडळाच्या रत्नागिरी कार्यालयातून माहिती घेतली असता, हाऊसबोटीची सद्यस्थिती आम्हाला माहीत नाही, असे उत्तर मिळाले.
सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे हाऊसबोट पर्यटनाचा उपक्रम महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचधर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडीत जलपर्यटनाचा उपक्रम पर्यटन महामंडळाला सुरू करायचा आहे. त्यासाठी केरळमधून दाभोळ धक्क्याला पर्यटन महामंडळाची पहिली हाऊस बोट लागली.
या बोटीत दोन कुटुंबांसाठी स्वतंत्र, आकर्षक बेडरुम आहेत. बोटीवरच चहा, नाश्ता व जेवणाच्या व्यवस्थेसाठी स्वयंपाकघर आहे. २४ तासांसाठी ही बोट पर्यटकांना देण्यात येते. ५ ते ७ हजार रुपयांमध्ये दाभोळ खाडी सफरीचा आनंदही पर्यटकांना लुटता येणार आहे. मात्र, सध्या ही बोटच नादुरुस्त असल्याने दाभोळ खाडी सफरीची योजना सुरू होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे गुहागरातील नागरिकांचे जलसफरीचे स्वप्न सुरु होण्यापूर्वीच भंगले आहे.
देखभाल दुरुस्ती जबाबदार व्यक्तीच नाही
कोणतीही बोट पाण्यात उभी असते, त्यावेळी तिचे डिझेल इंजिन सुरु ठेऊन बोटीतील पाणी बाहेर काढण्याचा पंप २४ तास सुरू ठेवावा लागतो. या हाऊसबोटीची देखभाल करण्याची जबाबदार एका व्यक्तीची निश्चित नाही. पौष महिन्यापासून आहोटीचेवेळी पाण्याची पातळी खूप खाली जाते. खाडीकिनारी नांगरलेली हाऊसबोट आहोटीच्यावेळी जमिनीला टेकली. सर्वसाधारणपणे बोट जमिनीला टेकली की एका बाजूला कलंडते आणि कलंडलेली बोट भरतीच्यावेळी सरळ होऊन तरंगू शकत नाही. त्यामुळे बोटीत पाणी शिरते.
ही हाऊसबोट चालविण्यासाठी खासगी व्यावसायिकाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून, त्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यावर हाऊसबोटीचा उपक्रम सुरू होईल. त्यासाठी अजून काही काळ जाईल. कारण ही प्रक्रिया अजूनही निविदास्तरावर आहे.
- रवी पवार,
पर्यटन महामंडळ, मुंबई
कोणतीही होडी, ट्रॉलर, यांत्रिक नौका पाण्यात उभी असेल तर लहान मुलाप्रमाणे तिची देखभाल करावी लागते. अन्यथा लाखो रुपये खर्च करावे लागतात. गेले दोन महिने हाऊसबोट दाभोळ किनाऱ्यावर उभी आहे. बोटीच्या लाकडाला खवले धरले आहेत. भरतीचे पाणी बोटीत शिरून मशिनरी खराब झाली आहे. मात्र, बोटीचे मालक येथे येतच नाहीत.
- विघ्नेश मायनाक,
मच्छीमार, दाभोळ,