पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:31+5:302021-08-20T04:35:31+5:30
दापोली : काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा एकदा रिपरिप पडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर चिखल ...
दापोली : काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा एकदा रिपरिप पडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर चिखल झाला असून, काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पावसाने रिपरिप सुरू ठेवली असली तरी यामुळे कोणत्याही आपत्तीची नोंद दापोली तहसील कार्यालयात झालेली नाही.
ऑनलाईन वेबिनार
रत्नागिरी : झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ग्रामीण रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दरवर्षी मत्स्यव्यवसाय विषयक विविध व्यवसायांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इच्छुक व्यक्ती तसेच मत्स्य शेतकरी यांच्यासाठी ‘निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य व कोळंबी संवर्धन’ या विषयावर ऑनलाईन माेफत वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. हे वेबिनार दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ ते संध्याकाळी ५.३० यावेळेत होणार आहे.
वर्धापनदिन
रत्नागिरी : क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेतर्फे फाटक हायस्कूलच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक तसेच संघटनेचे कोकण संपर्कप्रमुख विकास साखळकर, जिल्हाध्यक्ष पद्माकर नार्वेकर व अन्य सभासद उपस्थित होते.
कलावंतांना मार्गदर्शन
रत्नागिरी : ‘कलावंत मानधन’ योजनेसंदर्भात राष्टीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांनी कोकण नमन कलामंचच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे आयोजित कलावंत मेळाव्यात मार्गदर्शन केले. पानवल होरंबेवाडी येथे हा मेळावा झाला. यामध्ये अर्ज कसा करावा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते; याची माहिती भोळे यांनी दिली. यासाठी काही मदत आवश्यक असेल तर कधीही संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
पथदीपचे उद्घाटन
देवरुख : देवरुख गेल्येवाडी येथे उभारण्यात आलेल्या पथदीपाचे उद्घाटन नगरसेविका रेश्मा किर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. देवरुख नगर पंचायतीच्या माध्यमातून गेल्येवाडी येथे पथदीप बसविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे वाडीतील अंधार दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
‘सह्यगिरी’चे प्रकाशन
राजापूर : तालुक्यातील खापणे महाविद्यालयाच्या ‘सह्यगिरी’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन जागृती सेवा मंडळ, रायपाटणचे अध्यक्ष अमोल गांगण व पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या वार्षिक उपक्रमांचा आणि कार्याचा आलेख प्रकाशित करण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने ‘सह्यगिरी’चे प्रकाशन केले जाते. कोरोना कालखंडातील अनुभवविश्वावर विद्यार्थ्यांनी केलेले स्वरचित लेखन यामध्ये आहे.
अपघाताचा धोका
जैतापूर : राजापूर तालुक्यातील पश्चिम भागातील सागरी महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या काटेरी झाडा-झुडपांमुळे प्रवासाला धोका निर्माण झाला आहे. या सागरी महामार्गावरील खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त झालेल्या वाहनधारकांसाठी हा रस्ता दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे धोकादायक बनला आहे.
स्टेडियमवरील दुरवस्थेबाबत उद्या बैठक
रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरील खेळपट्टी आणि मैदानाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या दुरवस्थेबाबत रत्नागिरीतील आजी-माजी क्रिकेटपटू तसेच हितचिंतकांची बैठक शनिवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्टेडियमवर आयोजित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक
दापोली : दापोली कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा गिम्हवणेकर हिने कृषी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रावे येथील शेतकऱ्यांना फळझाड कलमीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमात फळझाडांचे कलम कसे तयार करायचे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
मदतीचा हात
मंडणगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)तर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या हस्ते मदत वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मंडणगड तालुकाध्यक्ष अरविंद यलवे, सरचिटणीस अनिल साखरे, उपाध्यक्ष संजय तांबे, कोषाध्यक्ष नानू खैरे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.