Ratnagiri: टेरवमधील कोळसा भट्ट्यांप्रकरणी ड्रोनद्वारे पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:42 PM2023-11-25T16:42:56+5:302023-11-25T16:43:12+5:30
चार दिवसांपूर्वी टेरव येथील तीन कोळसा भट्ट्यांवर कारवाई
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील कोळसा भट्ट्यांवरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे वनविभागाकडून टेरव व परिसरात अधिकाऱ्यांसह ड्रोनच्या माध्यमातून लाकूडतोड आणि कोळसा भट्ट्यांचा शोध घेण्यात आला. टेरव येथील दत्तवाडी, वेतकोंड, कामथे घाट परिसर व खोऱ्यात केलेल्या पाहणीत लाकूडतोडीसह कोळसा भट्ट्या कुठेही न दिसल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने केले आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय चिपळूण व परिक्षेत्र कार्यालय फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण) यांच्यामार्फत संयुक्तरीत्या ही मोहीम विभागीय वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. चार दिवसांपूर्वी टेरव येथील तीन कोळसा भट्ट्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावर महाराष्ट्र वन नियमावली, नियम ३१, ५३, ८२ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध वृक्षतोड झालेल्या ठिकाणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम (विनियमन) १९६४ सुधारणा १९८९ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
टेरव येथे शासकीय वनक्षेत्र नाही. वनविभागाच्या मालकी क्षेत्रात कोठेही अवैध वृक्षतोड झाली नसल्याची खात्री करण्यात आली. ही पाहणी विभागीय वनअधिकारी दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर, वनपाल दौलत भोसले, रामदास खोत, रामपूर वनरक्षक शिंदे, राहुल गुंढे, प्रशांत शिवणकर यांनी केली.
कोळसा भट्ट्यांवरून टेरव ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. गावात सुमारे ८ ते १० कोळसा भट्ट्या असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. केवळ तीन भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच ज्यांनी कोळसा भट्ट्यांसाठी जंगलतोड केली, त्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. गावात वनविभागाचे अधिकारी पाहणीसाठी येणार असल्याची कुणकुण लागताच व्यावसायिकांनी गुरुवारी रात्री कोळशाची विल्हेवाट लावल्याची चर्चा आहे.