चिपळुणातील गावठाण क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण, ३० हेक्टर क्षेत्र पहिल्यांदाच येणार नकाशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:30 PM2022-03-25T18:30:38+5:302022-03-25T18:31:05+5:30
ब्रिटिशकाळापासून पहिल्यांदाच हे गावठाण क्षेत्र नकाशावर येणार आहे.
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांमधील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर चिपळूण तालुक्यातील ९० गावांमधील सुमारे ३० हेक्टर गावठाण क्षेत्रात सर्वेक्षण सुरू झाले आहे.
काही गावांमध्ये केवळ चार गुंठे तर आकले गावात सर्वाधिक चार हेक्टरचे गावठाण क्षेत्र आहे. प्रत्येक कुटुंबाची घरे व लगतच्या जमिनीची हद्द निश्चित करून त्यांना नजीकच्या काळात या मालमत्तेचे प्राॅपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. ब्रिटिशकाळापासून पहिल्यांदाच हे गावठाण क्षेत्र नकाशावर येणार आहे.
तालुक्यात एकूण १६९ महसुली गावे असून, त्यापैकी ९० गावांमध्ये गावठाण क्षेत्र आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनींची नोंद महसूल विभागाकडे आहे. मात्र, लोकवस्ती असलेल्या गावठाण क्षेत्रातील प्रत्येकाची नोंद महसूल अथवा भूमी अभिलेख खात्याकडे नव्हती. ब्रिटिश काळापासूनची ही पद्धत पुढे कायम होती.
दरम्यान, गावठाण क्षेत्रातील प्रत्येकाच्या जागेची हद्द निश्चित व्हावी. गावठाण हद्दीतील प्रत्येक कुटुंब अथवा व्यक्तींचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार व्हावे, यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाची सुरूवात मंडणगड तालुक्यातून झाली होती.
तालुक्यातील ड्रोन सर्वेक्षणासाठी भूमी अभिलेखचे सहा कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कामाला गती मिळण्यासाठी आणखी एक ड्रोन मागविण्यात आला आहे. सर्वेक्षणात दररोज सहा गावे पूर्ण केली जात आहेत. ९० मीटर उंचीवरून गावठाण क्षेत्राचे चित्रीकरण आणि छायाचित्र घेण्यात येत आहे.