खेड तालुक्यातील २५ गावात दुष्काळच

By Admin | Published: June 3, 2016 10:46 PM2016-06-03T22:46:46+5:302016-06-04T00:42:33+5:30

पाण्यासाठी भटकंती सुरूच : टॅँकरच्या संख्येत तातडीने वाढ करण्याची ग्रामस्थांची मागणी

Drought in 25 villages in Khed taluka | खेड तालुक्यातील २५ गावात दुष्काळच

खेड तालुक्यातील २५ गावात दुष्काळच

googlenewsNext

खेड : खेड्यापाड्यात पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते. विविध जलस्रोत उपलब्ध असतानाही त्यातील निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत. याकडे लक्ष देण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही वेळ नसल्याने सर्वच जलस्रोत संकटात सापडले आहेत. खेड तालुक्यातील २५ गावे आणि ३८ वाड्या आजही दुष्काळात होरपळून निघत आहेत. जनावरांसह माणसांनाही पुरेसे पाणी मिळत नसल्याने उन्हाच्या या चटक्यात माणसांना जीवन असह्य होत आहे. प्रशासनाने यावर गांभीर्याने मात करणे आवश्यक असून, तातडीने टँकरच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
खेड तालुक्यातील खेडेगावात आजही ३२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य आहे. डोंगरदऱ्यातील गावांमध्ये ही समस्या अधिकच जटील झाली आहे. तालुक्यात नद्या, ओढे, नाले व दऱ्या यांसारखे विविध नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यातील बरेचसे जलस्रोत गाळाने भरले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधीनीही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे जलस्रोत विकसित होऊ शकले नाहीत. पाण्याची टंचाई जाणवत असलेल्या २५ गावांमध्ये व ३८ वाड्यांमध्ये दुष्काळाचा वणवा पेटला आहे. ५ टँकरच्या सहाय्याने या गावांना व वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी तो पुरेसा नाही. जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने या गावांतील लोकांचे व जनावरांचे हाल होत आहेत.
नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल जास्त आहे. जुनी योजना दुरूस्त करायची आणि वेळ मारून न्यायची, यापलिकडे राजकारण्यांचे काहीच काम नाही. ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या बंधाऱ्यांमध्ये पाणीच थांबत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
जगबुडी नदीसह इतर नद्यांकडेही तसेच दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तालुक्यातील एकमेव मोठ्या असलेल्या जगबुडी नदीवरच पाणीटंंचाई काळात मोठा भार पडत आहे. खेड शहराला पाणी पुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्त्वासाठी धडपडत आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे.
हा गाळ काढण्याचे प्रयत्न गेल्या १० वर्षांपासून खेड नगरपालिकेकडून सुरू आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अपुऱ्या निधींमुळे बोरज धरण वर्षानुवर्षे गाळात रूतत चालले आहे. तालुक्यातील २५ गावे आणि ३८ वाड्यांमध्ये ५ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. कागदावर दुष्काळ नसलेल्या आणि प्रत्यक्षात होरपळत असलेली गावे आणि वाड्यांमध्ये मात्र प्रशासनाबद्दल कमालीची चीड निर्माण झाली आहे.
तालुक्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता पूर्वेला दक्षिणोत्तर सह्याद्रीच्या रांगा, तर पश्चिमेला खाडी आहे. तालुक्यातील बहुतांश नद्या डोंगररांगांमध्येच उगम पावतात. पूर्व - पश्चिम उतारामुळे पाणी खाडीला मिळते. यातूनच पारंपरिक जलस्रोतांना पाणी मिळते. या जलस्रोतांच्या आधारे पाण्याच्या मार्गावर असलेल्या गावांमध्ये शेतीबागायत केली जाते.
मात्र, शेती-बागायतींसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने हे नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी मार्च महिन्यातच संपुष्टात येते. उर्वरित जलस्रोत आजही अविकसित आहेत. त्यामधील पाणी आजही प्रदूषित आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. आरोग्य विभागाकडून नदी, ओढे, नाले तसेच विहिरींमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाते. हे पाणी प्रदूषित असून ते पिण्यास योग्य नसल्याचा अभिप्रायही या विभागाकडून दरवर्षी प्राप्त होतो. अलिकडे पाण्यासाठी कृत्रिम स्रोतांचा वापर वाढला असून, याचा थेट परिणाम नैसर्गिक स्रोतांना होत आहे.
विविध प्रकारे होत असलेल्या या प्रदूषणामुळे नैसर्गिक स्रोतांचे झरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बाधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये आजही पाणी शिल्लक नसल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. खाडीपट्टा विभागात आणि अठरा गाव धवडे बांधरी विभागातील जनतेला रात्रीचे १२ वाजेपर्यंत डबक्यामधून बेलीच्या सहायाने पाणी भरावे लागत आहे. तेही पुरेसे नसल्याने पाणीटंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. (प्रतिनिधी)


धनगरवाड्या तहानलेल्या : टॅँकरच्या पाण्याचाच आधार
तालुक्यातील १८ धनगरवाड्या आजही तहानलेल्या आहेत. या वस्त्यांमध्ये टँकर जात नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर कशी मात करायची, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. अठरा गाव धवडे बांदरी विभागातून उगम पावलेल्या जगबुडी नदीचा सुकिवलीमध्ये शिरवली धरण व नातुवाडी धरणाच्या पाण्याचा संगम झाला आहे. या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहराला पुरविले जाते. पुढे हेच पाणी खाडीला मिळत असल्याने ते पाणी पिण्यायोग्य राहात नाही. त्यामुळे खाडीपट्टा भागातील जनतेला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत नैसर्गिक जलस्रोतांवरच अवलंबून राहावे लागते. त्यानंतर मात्र या भागातील जनतेला टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: Drought in 25 villages in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.