दुष्काळी भागाचा घास स्थानिक जनावरांच्या मुखी
By admin | Published: June 12, 2016 11:21 PM2016-06-12T23:21:36+5:302016-06-13T00:12:29+5:30
राजापूर : दुष्काळी भागाला एका पेंढ्याचीही मदत नाही
राजापूर : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळावा, यासाठी सौंदळ व पाचल येथे सुमारे ५० एकर जागेत केलेल्या पेरणीनंतर उगवलेला चारा मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केल्यामुळे पावसाळ्याला सुरुवात झाली तरी एक पेंढाही दुष्काळी भागात येथून रवाना झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी केलेला पहिलाच प्रयोग अपयशी ठरला आहे. चारा तयार करून त्याच्या संरक्षणासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नसल्याने हा चारा फस्त झाला.
यावर्षीचा उन्हाळा कडाक्याचा गेला. त्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला बसला. पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांसाठीचा पाणीप्रश्न उग्र बनून राहिला होता. त्यामुळे प्रशासनाला पाण्याचा पुरवठा करताना नाकीनऊ आले होते. दुष्काळी भागातील जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते तसेच चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला होता.
ओला चारा आणायचा कुठून, ही समस्या कायम असताना राज्याच्या अन्य भागातून दुष्काळी भागातील जनावरांना चारा पुरवला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात उपलब्ध पाणी व ओसाड जमिनी लक्षात घेता, त्या जमिनीत काही एकरात मक्याची पेरणी करायची व हा तयार चारा दुष्काळी परिसरात पाठवायचा या उद्देशाने राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी पाचल व सौंदळमधील शेतकऱ्यांशी चर्चा करुन काही एकरात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या सहाय्याने तत्काळ पेरण्या करण्यात आल्या. स्थानिक जनतेनेचे सहकार्य मिळाले.
या पेरणीला पाणीपुरवठा महसूलचे दोन कर्मचारी करत होते. बऱ्यापैकी चारा तयारही झाला होता. मात्र, संपूर्ण चाऱ्याभोवती कुठल्याही प्रकारचे बंदिस्त कुंपण घालण्यात न आल्याने परिसरातील मोकाट जनावरांनी हा चारा खाऊन टाकला. फक्त पाचलमधील चाऱ्याभोवती कुंपण घालण्यात आल्याने त्या ठिकाणचा चारा वाचवता आला. सौंदळमधील हा ओला चारा जनावरांनी फस्त केला.
परिणामी नंतर प्रशासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पुढील प्रक्रिया थांबली. दुष्काळग्रस्तांसाठी चाऱ्याची पेरणी होऊनही येथून एकही चाऱ्याचा पेंढा पावसाळा सुरु झाला तरी दुष्काळी भागात गेलेला नाही. पाचलमधील चारा तयार होऊनही त्याचे काय झाले ते मात्र कळू शकलेले नाही. (प्रतिनिधी)
उपक्रम कशासाठी : चाऱ्याच्या संरक्षणाची उपाययोजनाच नाही
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळण्यासाठी राजापूर तालुक्यात चारा तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, तयार होणाऱ्या चाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणतीही उपयायोजना करण्यात न आल्याने नेमका हा उपक्रम कशासाठी राबविण्यात आला? असा सवाल केला जात आहे.
चारा गेला कुठे?
सुमारे ५० एकर जागेत पेरणीनंतर उगवलेला चारा एका रात्रीत मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केला का? असा सवाल आता केला जात आहे. एवढ्या मोठ्या जागेतील सर्व चारा गायब कसा झाला? याचे उत्तर अनुत्तरीत आहे. चारा नक्की जनावरांनी फस्त केला का, असा सवाल होत आहे.