बुडणाऱ्या तरुणाला देवरूखच्या ‘राजा’ने वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:21+5:302021-09-23T04:36:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवरूख : पुलावरून जाताना झेप गेल्याने नदीत पडलेल्या तरुणाला राजा गायकवाड या तरुणाने आपला जीव धोक्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : पुलावरून जाताना झेप गेल्याने नदीत पडलेल्या तरुणाला राजा गायकवाड या तरुणाने आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे. बुधवारी दुपारी ही घटना देवरूखच्या खालची आळी भागात घडली. स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या राजा गायकवाड यांनी आतापर्यंत अनेक जणांना असे जीवदान दिले आहे.
बुधवारी दुपारी देवरूखच्या खालची आळी भागातील साठ्ये हॉलजवळील बौद्धवाडीला जोडणाऱ्या पुलावरून देवरूख बौद्धवाडीतील कदम नामक एक तरुण जात होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो सुमारे २५ ते ३० फुटांवरून सप्तलिंगी नदीत पडला. हा तरुण वाहत जात जाळीमध्ये अडकला. ही गोष्ट लक्षात येताच देवरूखमधील स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचा जीवरक्षक राजा गायकवाड याने नेहमीप्रमाणे आपल्या जिवाची बाजी लावून त्या तरुणाचा जीव वाचवला. गेले दोन दिवस चांगलाच पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे वेळीच मदत मिळाली नसती, तर अनर्थ ओढावला असता.
ही घटना प्रथम राजू शिर्के यांनी निदर्शानास आणून दिली. याप्रसंगी देवरूखचे नगरसेवक बाबू मोरे, वैभव कदम, तसेच संतोष मुंडेकर आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. यापूर्वीही राजा गायकवाडने अनेकांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळे राजाकडे देवदूत म्हणून पाहिले जाते.