दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट; मात्र, वर्दळ वाढलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:57+5:302021-04-08T04:31:57+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे बुधवारी शहर आणि ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे बुधवारी शहर आणि परिसरात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि औषधे दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या दुकानांसमोर शुकशुकाट होता. मात्र, रस्त्यावर वाहनांची वर्दळ मात्र कायम होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानेही मंगळवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यानुसार दिवसा ७ ते रात्री ८ या वेळेत जमावबंदी आणि रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोमवार, दि. ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन दिवसांत नागरिकांना अजिबातच बाहेर पडता येणार नाही.
जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढताच जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी या लाॅकडाऊनला कडाडून विराेध केला. न्यायालयात केस दाखल केली तरीही आम्ही दुकाने बंद करणार नाही, असा पवित्रा सर्वच दुकानदारांचा होता. मात्र, राज्याचा निर्णय असल्याने त्यांना तो मान्य करावा लागला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवताना या लाॅकडाऊनला विरोध असल्याचे फलक लावले आहेत.
मंगळवारी सकाळी काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. मात्र, पोलिसांनीही दुकाने बंद करायला लावली. बुधवारी मात्र, किराणा, जनरल स्टोअर्स, औषधांची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या दुकानांसमोर दिवसभर शुकशुकाट होता. मात्र, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरूच होती. वाहनांची ये जा कायम होती. मात्र, लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा पुन्हा रस्त्यावर उभी राहिली. ये जा करणाऱ्या नागरिकांनी हेल्मेट, तसेच मास्क लावला नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पावतीद्वारे न करता ऑनलाईन कारवाई केली जात होती.
किराणा दुकाने, तसेच औषधांच्या दुकानातून रांगा लावून नागरिकांना खरेदी करावी लागत होती. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्णपणे बंद असल्याने नागरिक आतापासूनच सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट असली तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही मार्चअखेरची धावपळ असल्याने १०० टक्के कर्मचारी उपस्थित होते.
कोटसाठी
सध्या जिल्ह्यात कोरोनाची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी नियमांचे पालन करायला हवे. सध्या धोका वाढला आहे. त्यामुळे किमान ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळायला हवी.
दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी
चौकट -
जिल्हा प्रशासनाने सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, यासाठी बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली. सर्व व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.