रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:31 AM2021-04-24T04:31:13+5:302021-04-24T04:31:13+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
पोलीस यंत्रणा राबतेय सुरक्षिततेसाठी
रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीत शासनाने निर्बंध लादलेले असतानाही अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत होते. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. तरीही पोलीस यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास राबत आहे.
खोदाईचे काम शुक्रवारी बंद
रत्नागिरी : शहरात पाईपलाईन घालण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामाची गती कमी झाली आहे. तरीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी रत्नागिरी - मजगाव रस्त्यावर सुरु असलेले खोदाईचे काम बंद ठेवण्यात आले होते.
रस्त्यावर ठिकठिकाणी फळविक्रेते
रत्नागिरी : हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोजच्या कमाईवर रोजचा जिन्नस आणून संसार चालविणारे अनेक जण आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा मर्यादित वेळेसाठी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. शहर परिसरामध्ये फळविक्रेते हातगाड्या घेऊन फिरतानाचे चित्र पाहावयास मिळते.
सर्वच गार्डन बंद
रत्नागिरी : नेहमी सायंकाळच्या सुमारास गजबजणारी गार्डन कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. लोक नेहमीच सायंकाळी शांत वातावरणात फिरण्यासाठी गार्डनमध्ये जात होते. हजारो लोक शहरातील वेगवेगळया गार्डनमध्ये फिरताना दिसत होते. मात्र, ही गार्डन सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.
खासगी दवाखान्यांमध्ये रुग्ण घटले
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीमुळे लोकांनी खासगी डॉक्टरांकडे आजारपणातही जाणे कमी केले आहे. खासगी डॉक्टरकडे रुग्ण उपचारासाठी गेल्यावर त्यांनी शासनाला कळविल्यास कोरोना रुग्ण समजून घेऊन जातील, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे.
थंड पेयांचा व्यवसाय ठप्प
रत्नागिरी : कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेये, बाटली बंद पाणी यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिल, मे मध्ये थंड पेयांच्या व्यवसायावर संक्रांत आली होती. त्याप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे थंड पेयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.