एका अर्जामुळे विषय समितीच्या निवडीत रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:59+5:302021-04-06T04:30:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस सिद्धी पवार यांनी स्थायी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्व निवडी बिनविराेध पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या स्थायी, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास समिती, महिला व बाल कल्याण, समाजकल्याण समितीतील सदस्यांनी राजीनामे दिल्याने एकूण १२ पदे रिक्त हाेती. त्यातील स्थायी समितीच्या रिक्त २ जागांसाठी ३ तर कृषी समितीच्या ३ जागांसाठी ४ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही समितीसाठी सिद्धी पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना दिशा दाभोलकर यांचे सूचक अनुमोदन होते.
स्थायीसह कृषी वगळता अन्य जागांसाठी मात्र रिक्त पदांएवढेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे स्थायी आणि कृषी समितीच्या निवडीबद्दल उत्सुकता लागली होती. मात्र, सिद्धी पवार यांनी आपले दोन्ही अर्ज मागे घेतल्यानंतर स्थायी, कृषीसह सर्व समिती सदस्य निवड बिनविरोध पार पडली.
स्थायी समितीमध्ये रोहन बने व महेश म्हाप यांची निवड झाली. कृषी समितीमध्ये जयसिंग माने, मानसी जगदाळे आणि संजना माने यांची निवड झाली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीमध्ये मानसी आंबेकर व पूर्वी निमणूकर यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये रजनी चिंगळे व ॠतुजा जाधव यांची निवड झाली आहे. समाजकल्याण समितीमध्ये महेश नाटेकर व सुनील मोरे यांची निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.