मोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:43 PM2019-06-20T13:43:44+5:302019-06-20T13:45:01+5:30
बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने दगड टाकून भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
लांजा : बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने दगड टाकून भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. वाकेड घाटात मोठ्या प्रमाणात असलेले डोंगर कटींग करण्यात आले आहेत. तसेच महामार्गाचे रुंदीकरणासाठी दगड व मातीचा भराव टाकण्यात आला आहे.
याआधी दिवाळीत पडलेल्या पावसात वाकेड येथे चिखल माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दिनांक १३ जून रोजी कुवे येथे मोरीचा भराव खचल्याने ट्रक अडकून पडला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
बुधवारी सायंकाळी ४ वाजता मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीवरील मातीचा भराव खचला व माती पाण्याने वाहून गेल्याने दोन्ही साईडची वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी ५ वाजता वाकेड येथील मोरी खचली आणि मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जवळपास तीन तास ही वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळी वाकेड सरपंच संदीप सावंत, जयवंत भितळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबी व महामार्गाचे ठेकेदार यांना बोलावून युध्दपातळीवर भराव भरण्याचे काम सुरू केले. यावेळी वाटूळ मार्र्गे वाहतूक वळविण्यात आली होती. रात्री सव्वाआठच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.