आंबवलीत वडिल मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 07:14 PM2019-05-20T19:14:15+5:302019-05-20T19:15:22+5:30
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.
देवरूख : उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.
जनार्दन हे मुंबईत वास्तव्याला असतात. ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करतात. त्यांचे मुळ घर आंबवली सुतारवाडी असून दरवर्षी मे महिन्यात काही दिवस सुट्टीनिमित्त येतात. १५ दिवसापूर्वीच हे कुटुंब आंबवलीत वास्तव्याला आले होते. सोमवारी सकाळी जनार्दन हे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर याठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही.
यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले. आपण बुडत आहोत याची कल्पना येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. याच दरम्यान काठावर बसलेल्या कुटुंबियांनी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा आधार देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ प्रसादच काठीच्या सहाय्याने काठावर आला.
उर्वरित तिघेहीजण पाण्यात बुडाले. काही मिनिटातच याची खबर गावात मिळाल्यावर असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. पोलिस पाटील अजित गोपाळ मोहिते यांनी याची खबर देवरूख पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र्र पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह संगमेश्वरात नेण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते.