कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यात १४,७९४ खाती झाली निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:02+5:302021-03-26T04:32:02+5:30
रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी ...
रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी १५,६९१ शेतकऱ्यांचे अर्ज (२५ मार्चपर्यंत) पात्र ठरले आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण झालेली खाती १५,१३५ असून ५५५ खात्यांचे प्रमाणीकरण व्हायचे आहे. आतापर्यंत १४,७९४ खात्यांवरील कर्ज माफ झाले असून या शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित खात्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९४०० खातेदारांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार ९३० रुपयांची कर्जमाफी झाली आहे. उर्वरित खाती राष्ट्रीय बँका, खासगी बँका, सहकारी बँका यांची आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४,७९४ शेतकऱ्यांना ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. धार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी दुसरा आधार क्रमांक, मयत झालेले शेतकरी, वारस तपास रखडलेले अशी खाती यामुळे अडचणी येत आहेत.
- सुधीर कांबळे, अधीक्षक, जिल्हा निबंधक कार्यालय
जिल्हा बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका
जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक गावात असल्याने शेतकऱ्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत. या बँकेच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्वाधिक मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत कर्जमुक्ती झालेल्या १४,७९४ शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेकडून ९,४०० शेतकऱ्यांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार रुपयांची कर्जमाफी झाली.