रस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे होणार पुरते हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:23 PM2021-04-06T12:23:08+5:302021-04-06T12:24:10+5:30
road transport Ratnagiri- रत्नागिरी शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाल्याने नवीन सुधारित नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या बाजूला खोदाईचे काम करण्यात आले. या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ताच गायब झाला आहे.
या नळपाणी योजनेबरोबरच शहरात गॅस लाईन आणि केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ही कामे पूर्णत्वाला गेली असून, अजूनही नळपाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शीळपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दोन महिन्यांतच शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले होते.
नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते गुळगुळीत होऊन प्रवास सुखकर होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नळपाणी योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. नगर परिषदेने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत काम करणे मुश्कील होणार आहे. त्यातच पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे न करण्याचे निर्देश शासनाकडून दिलेले आहेत. हे काम पूर्ण झाल्याशिवाय मारलेला चर बुजविता येणार नाही.
अनेक ठिकाणी अजूनही चरामधील माती तशीच ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने उंचवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यातही हे चर, तसेच राहणार असल्याने रस्ता चिखलमय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. चरांमध्ये पाणी साचून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.
अपघातांचा धोका
अर्धवट राहिलेल्या चरांमधील माती पावसाळ्यात आणखी खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा पडण्याची भीती अधिक आहे. या खड्डयात पाणी साचल्याच नागरिकांच्या तो लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यात वाहन फसण्याचा किंवा पादचारी अडकून पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढणार आहे.