निवडणुकीची धामधूम, यंदा मद्याचा साठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:00 PM2019-03-27T18:00:02+5:302019-03-27T18:05:56+5:30
निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे.
रत्नागिरी : निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ मार्च रोजी जिल्ह्यात २ हजार २५ लीटर इतका जास्त साठा करून ठेवण्यात आला आहे. गतवर्षी ३८ हजार ३१७ लीटर इतका मद्याचा साठा होता तर यावर्षी ४० हजार ३४३ लीटर इतका साठा आहे.
निवडणुकीच्या काळात अनेक तळीराम राजकीय पक्षांच्या कामात हिरहिरीने सहभागी होतात. निवडणुकीचे काम केले की, सायंकाळी श्रमपरिहार करणारे अनेकजण असतात. त्यामुळे त्यांची बडदास्तदेखील राजकीय पक्षांकडून ठेवली जाते. त्यांची चोख व्यवस्थाही केलेली असते. निवडणुका जवळ आल्याने मद्यविक्रेत्यांनी आपल्या दुकानातील मद्याचा साठा आतपासूनच वाढविण्यास सुरूवात केली आहे.सद्यस्थितीत २५ मार्च रोजी गतवर्षीपेक्षा २ हजार २५ लीटर इतका जास्त साठा करून ठेवण्यात आला आहे.
१ हजार ७१७ शस्त्र जमा
- २५ मार्च २०१९ रोजी ४२ शस्त्र जमा करण्यात आली असून, आतापर्यंत १ हजार ७१७ शस्त्र जमा केली आहेत. तसेच कलम १०७ अन्वये ३२३, कलम १०९ अन्वये २६, तर कलम ११० अन्वये ३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ,९३ जणांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत.
- राज्य उत्पादन शुल्काने आतापर्यंत ७५ ठिकाणी छापे मारले आहेत. त्यामधून ८ लाख ८२ हजार ४६८ रूपये किमतीचा २४ हजार ७१४ लीटर इतका मद्यसाठा जप्त करण्यात आला, तर ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.