लहरी हवामानामुळे ‘कोकणचा राजा’ बेभरवशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:29 AM2021-03-13T02:29:27+5:302021-03-13T02:30:14+5:30
हापूसचे उत्पादन ३० टक्केच होण्याची शक्यता, चक्रीवादळानंतर ऋतूचक्र बदलल्याचा परिणाम
मनोज मुळ्ये/महेश सरनाईक
रत्नागिरी / सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील हवामानात मोठे फेरबदल होत आहेत. उशिरापर्यंत पडलेला पाऊस, लांबलेली थंडी यामुळे मोहोर खूपच कमी आल्याने हापूस आंब्याचे उत्पादन यंदा केवळ २५ ते ३० टक्केच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पिकला तरी कोकणचा राजा काही झिम्मा खेळू शकणार नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांनाही बाजारात परडवणाऱ्या दरात आंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे.
कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा आंबा पिकावर अवलंबून आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ५०० कोटींची उलाढाल होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही साधारण तेवढीच उलाढाल होते. मात्र, ऋतूचक्रात सतत होणाऱ्या बदलांमुळे आंबा पीक आता खूपच बेभरवशी झाले आहे.
दरवर्षी फेब्रुवारीत १० टक्के, मार्चमध्ये सुमारे २० टक्के आंबा मुंबईला जातो. एप्रिल आणि मेमध्ये उर्वरित आंबा बाजारात जातो.
nमेच्या अखेरच्या आठवड्यापासून कोकणातील आंबा कॅनिंगसाठी जातो आणि त्याचवेळी अन्य राज्यातील आंबा मुंबईत येतो.
nयंदा फेब्रुवारीत गतवर्षीपेक्षा अधिक आंबा मुंबईत गेला. त्यात दरवर्षीप्रमाणे देवगड हापूसचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता आंब्यासाठी बाजाराला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा फेब्रुवारीत जादा आंबा मुंबई बाजारात गेल्याचा विरोधाभास दिसत असला तरी मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचे प्रमाण खूप कमी असेल.
५०००० टन देवगड हापूसचे उत्पादन
देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि पोषक वातावरण लाभल्यास उत्पादन ५० हजार टनांवर जाते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाची आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतातील सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी सहकारी संस्था आहे. त्यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्षे पूर्ण झाली.
निसर्ग वादळामुळे चक्र बिघडले
n गतवर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ आले. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील हवामानात खूप मोठे बदल झाले. पाऊस उशिरापर्यंत पडत होता. त्यामुळे थंडी उशिराने सुरू झाली.
n सप्टेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर ऑक्टोबरमधील उन्हामुळे झाडांच्या मुळावर ताण येतो आणि त्यातून मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.
n मात्र, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण अपेक्षित असते. यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस पडत होता. त्यामुळे तेव्हा उन्हाळा जाणवला नाही.
n थंडीही जानेवारीत सुरू झाली. त्यामुळे झाडांना मोहोर येण्याऐवजी सतत पालवीच येत होती.