गोठणेदोनिवडे-आंगले पुलामुळे जीवघेणा हाेडीचा प्रवास थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 06:27 PM2022-01-10T18:27:27+5:302022-01-10T18:27:57+5:30
होडीतून कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासातून लोकांची आता सुटका झाली आहे.
राजापूर : अर्जुना नदीवर गोठणेदोनिवडे आणि आंगले गावांना जोडणारा पूल मार्गी लागला आहे. त्यामुळे होडीतून कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासातून लोकांची आता सुटका झाली आहे.
या पुलासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्याला स्थानिकांनी दिलेली साथ निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा शब्दामध्ये आमदार राजन साळवी यांनी कौतुक केले. पंचक्रोशीतील विकासासाठी भविष्यामध्ये निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.
पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अनिल भोवड यांच्या अध्यक्षतेखाली गोठणेदोनिवडे-आंगले पुलाचे लोकार्पण करण्यात आले. पंचक्रोशी ग्रामविकास समिती आणि कोदवली-केळवली शिवसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
आमदार साळवी पुढे म्हणाले की, पुलाअभावी लोकांना होडीतून धोकादायक प्रवास करावा लागत होता. मात्र, पंचक्रोशी ग्रामविकास समितीने आपल्याशी संपर्क साधल्यानंतर शासनाकडे आपण केलेल्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्या निधीतून पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या पुलाच्या उभारणीमध्ये कै. मधुकर भोसले यांचे योगदान असल्याने कायदेशीर तरतुदी पाहून त्यांचे नाव देण्याचा निश्चितच प्रयत्न करू, असेही सांगितले. पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सचिव विश्वास राघव यांनी प्रस्तावना आणि सूत्रसंचालन केले.