थंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:20 PM2020-12-02T17:20:26+5:302020-12-02T17:21:26+5:30
Mango, Winter Session Maharashtra, ratnagirinews डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.
रत्नागिरी : डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.
अद्यापही ऑक्टोबर हिटप्रमाणे उष्मा जाणवत असून पाहिजे त्या प्रमाणात थंडी सुरू झालेली नाही. सर्वत्र पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यास सव्वा ते दीड महिन्याचा अवधी लागत असल्याने मोहोर प्रक्रियेस उशीर होण्याची शक्यता आहे.
पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव असल्याने कीटकनाशकांची फवारणीही वेळोवेळी करावी लागत आहे. काही ठिकाणी झाडांना किरकोळ मोहोर आला असून, तो जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अद्याप ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. आंब्याला मोहोर येण्यासाठी २६ ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता आहे.
जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये थंडीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे नीचांकी तापमानात येणाऱ्या मोहोराला फळधारणा अत्यल्प होते, त्याचवेळी पुनर्मोहोराचा धोका असल्याने एकूणच लहरी हवामानामुळे शेतकरी आतापासूनच धास्तावले आहेत.
पालवी सर्वाधिक असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे, यात शंका नाही. मात्र, गतवर्षी फळधारणा न झालेल्या झाडांना मोहोर आला असून, त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के इतकेच आहे. पालवीवर तुडतुडा मोठ्या प्रमाणावर असल्याने पालवीबरोबर मोहोर जपणे गरजेचे आहे.
- राजन कदम, बागायतदार