निधीअभावी अर्जुना नदीपलीकडील जाेडरस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:48+5:302021-05-14T04:30:48+5:30
राजापूर : राजापूरमधील अर्जुना नदीच्या पलीकडील चार वाड्यांकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्क्या रस्त्याचे काम अद्याप ...
राजापूर : राजापूरमधील अर्जुना नदीच्या पलीकडील चार वाड्यांकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्क्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असल्याने पावसाळी दिवसांत त्यावरून वाहने चालविणे अवघड बनणार आहे. दरम्यान या वाढीव कामासाठी निधीची तरतूद न केल्याने जोडरस्त्याचे काम रखडल्याचे पुढे आले आहे.
रायपाटणमधील अर्जुना नदीच्या पलीकडील बागवाडी, कदमवाडी, बौद्धवाडी आणि खाडेवाडी यांना जोडणाऱ्या वाहतुकीचा पूल गतवर्षी बांधून पूर्ण झाला होता. त्या पुलाचे कठडे व दोन्ही बाजूला जोडणाऱ्या पक्क्या स्वरूपातील जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मात्र, पुलावरून रहदारी सुरू झाली होती. उन्हाळ्यात संबंधित ठेकेदाराने पुलाच्या कठड्यांचे काम पूर्ण केले. मात्र, पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम अपूर्णावस्थेत राहिले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या वाढीव स्वरूपातील कामासाठी निधीची तरतूद नसल्याने काम पूर्ण झालेले नसल्याचे पुढे आले आहे. विद्यमान क्षणी पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते सततच्या वाहतुकीमुळे खराब बनले आहेत. त्यावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे. रस्त्यावरील खडी वर तर आली असून, ती आजूबाजूला पसरली आहे. त्यामुळे वाहने जपून चालवावी लागतात. वाहने घसरण्याचा धोकाही आहे.
पावसाळा सुरू व्हायला जेमतेम पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी जोडरस्त्याचे काम होणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. संबंधित विभागाने वाढीव निधी दिलेला नाही़ परिणामी, पुलाला जोडणाऱ्या दुतर्फा बाजूच्या रस्त्यांचे काम अपूर्णावस्थेत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे रायपाटणमधील चार वाड्यांकडे जाण्यासाठी अर्जुना नदीवर पूल बांधणे व पक्क्या स्वरूपाचा रस्ता बनविणे यासाठी चार वाड्यांतील मुंबईसह स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने संघर्ष केला होता़ शासन दरबारी पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे उपोषणही केले होते़ त्याची दखल माजी खा. नीलेश राणे यांनी घेतली होती़ त्यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची स्थानिक ग्रामस्थांसह भेट घेतल्यानंतर रायपाटणमधील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होतीच़ शिवाय वर्षभरात काम मार्गीही लागले होते. आ. राजन साळवी यांनीही या पुलासाठी पाठपुरावा केला होता.
रायपाटणमधील चार वाड्यांना जोडणाऱ्या अर्जुना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागले आहे. मात्र, त्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते यांचे काम अपूर्णावस्थेत असल्याने यावर्षी पुलावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे. संबंधित बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे पक्क्या स्वरूपात काम करावे, अशी मागणी आता स्थानिकांमधून करण्यात आली आहे.