जिल्हा परिषदेच्या इमारतीची दुरुस्तीअभावी दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2016 12:32 AM2016-06-03T00:32:54+5:302016-06-03T00:45:35+5:30
अक्षम्य दुर्लक्ष : मोक्याच्या जागेत असूनही प्रशासन बेफिकीर
सुभाष कदम -- चिपळूण -येथील पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानासमोर बहादूरशेख येथे असलेल्या मोक्याच्या जागेवरील इमारतींची गेली ८ ते १० वर्षे देखभाल न झाल्याने पडझड झाली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या इमारती आता अखेरच्या घटका मोजत आहेत. बहादूरशेख येथे गुरुकुल कॉलेजसमोर पंचायत समितीच्या मालकीचे सभापती निवासस्थान, उपअभियंता बांधकाम विभाग निवासस्थान, गटविकास अधिकारी निवासस्थान, पाणी पुरवठा उपअभियंता निवासस्थान व सहाय्यक अभियंतासाठी निवासस्थान आहे. सध्या येथे बांधकामचे उपअभियंता जालिंदर मोहिते राहतात, तर माजी सभापती शौकत मुकादम यांच्यानंतर एकाही सभापतीने सभापती निवासस्थानाचा वापर केलेला नाही. निवृत्त गटविकास अधिकारी सुरेखा खेराडे या गटविकास अधिकाऱ्यांचा बंगला वापरत होत्या. परंतु, त्यांच्या नंतर हाही बंगला बंद असतो. याच आवारात पाणी पुरवठा खात्याच्या उपअभियंत्यांसाठी व सहाय्यक अभियंत्यांसाठी एक इमारत आहे. या इमारतीत पूर्वी पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता एस. आर. चंदनशिवे राहात होते. त्यांची बदली झाल्यानंतर हे निवासस्थान वाऱ्यावर गेले.
इमारतींचा वापर होत नसल्याने इमारतींवरील कौले, रिपा, वासे यांची पडझड झाली आहे. दरवाजे निखळले आहेत, खिडक्यांचा पत्ताच नाही. इमारतीत वाळूचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाकडून ही इमारत निर्लेखित करण्यात आलेली नाही किंवा इमारतीची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. येथील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. दरवाजे कुजून गेले आहेत, तर खिडक्यांची मोडतोड झाली आहे. या इमारतींची दुरुस्ती केल्यास निवासस्थान म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वापरता येईल. मात्र याची कुणालाच फिकीर नसल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही इमारत पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीची पंचायत समितीच्या अखत्यारित असलेली चिपळूणमधील इमारतीची पडझड झाल्याचे वृत्त यापूर्वीही लोकमतने प्रसिध्द केले होते. परंतु, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. आता या इमारतीला घरघर लागली असून कोणत्याहीक्षणी ती जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बेपर्वाईमुळे शासकीय इमारतींची पडझड होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.