लस नसल्याने अनेकांना रांगेतूनच परतावे लागते घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:21+5:302021-04-28T04:34:21+5:30
राजापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत होत असलेल्या जनजागृतीमुळे आता लसीकरणासाठी सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. मात्र, अद्यापही लसीचा ...
राजापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत होत असलेल्या जनजागृतीमुळे आता लसीकरणासाठी सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. मात्र, अद्यापही लसीचा आवश्यक तो पुरवठा होत नसल्याने अनेकांना रांगेत उभे राहूनही, मध्येच लस संपल्यामुळे परत माघारी फिरावे लागत आहे.
राजापूर शहरात ग्रामीण रुग्णालयातही दररोज केवळ १०० जणांनाच लस उपलब्ध होत असल्याने अनेकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यात जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तीन केंद्रे अशी १२ लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालय, रायपाटण ग्रामीण रुग्णालय, तर ओणी, कुंभवडे, केळवली, सोलगाव, जैतापूर, धारतळे, फुफेरे ही सात प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचा समावेश आहे. तसेच कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सागवे, प्रिदावण व सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भू अशी आणखी तीन उपकेंद्रे आहेत. करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वत:ची इमारत नसल्याने व जवळेथरमध्ये इंटरनेटसाठी रेंज नसल्याने ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे वगळण्यात आली आहेत.
मात्र सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. तालुक्यात आजपर्यंत कोव्हॅक्सिनचा पहिला डोस २,७९५ जणांनी घेतला असून दुसरा डोस १२० जणांनी घेतला आहे, तर कोव्हिशिल्डचा पहिला डोस ६,९४७ जणांनी घेतला असून, दुसरा डोस १०३९ जणांनी घेतला आहे. मात्र, आवश्यक त्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध होत नसल्याने सध्या लसीकरणासाठी गर्दी करणाऱ्यांचा हिरमोड होत आहे.