एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे दाभोळ खाडीत मृत माशांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:19 PM2019-06-23T16:19:20+5:302019-06-23T16:19:46+5:30
अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघर्ष समितीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
- शिवाजी गोरे
दापोली : लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत अनेक मासे मृत अवस्थेत आढळले. या दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मासे वारंवार मरत असल्याने काही जाती दुर्मीळ तर काही जाती नामशेष झाल्या आहेत, त्यामुळे दाभोळ खाडीतील भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघर्ष समितीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर एमआयडीसीकडून ॲक्वा केम या कंपनीला प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याबाबत आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पंचनामा शिर्सीचे सर्कल मदरे यांनी केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनीही पाहणी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कारवाई करून ॲक्वा केम कंपनीचा ठेका रद्द करून एमआयडीसीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येते आहे.
नष्ट होत आलेल्या माशांची प्रजाती नुकतीच पुन्हा दाभोळखडीत दिसू लागली होती. पण आजच्या या प्रदूषित पाण्यामुळे सर्व जातीचे मासे मृत अवस्थेत आढळत आहेत. याबाबत दाभोळ खाडीतील सर्व मासेमार समाजातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत संघर्ष समिती सोमवारी खेड प्रांताधिकारी यांची भेट घेणार आहेत. हे प्रदूषित पाणी त्वरित थांबले नाही तर आम्ही स्वतः पाइपलाइन बंद करू, असा इशारा संघर्ष समिती तर्फे देण्यात आला आहे.