नाना पाटेकर यांच्या ‘नाम’मुळे काेकणातील अनेक गावे झाली जलसमृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:37 AM2021-08-25T04:37:03+5:302021-08-25T04:37:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून जलक्रांती करून पाणीटंचाईला रोखले आहे. या गावांनी दिलेल्या ‘जल है, तो कल है’च्या संदेशातून प्रेरणा घेत आता कोकणातील अनेक गावे नामच्या मदतीने जलक्रांतीसाठी पुढे येत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून भविष्यातील पाण्याचे मोठे संकट लक्षात घेऊन ‘जल है, तो कल है’च्या जनजागृतीसाठी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. केवळ जनजागृतीसाठीच नाही, तर प्रत्यक्ष जलक्रांती करण्यासाठी अनेक गावांना उद्युक्त करीत त्यासाठी त्यांना अद्यावत यंत्रसामग्री अनेक महिने मोफत उपलब्ध करून दिली. नाना पाटेकरांच्या नामचे कार्य अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले.
कोकणात पाऊस खूप पडतो, तरीही मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. त्यामुळे कोकणात गाळाच्या समस्येबरोबरच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ याबाबत जागृती होणे गरजेचे असल्याने नामचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी कोकणाकडे लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ मध्ये नाम फाऊंडेशनने चिपळूण आणि परिसरातील ९ शाळांमध्ये अडीच हजार झाडे लावून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे या दुर्गम भागात कोकणातील पहिल्या जलसमृद्धीच्या प्रकल्पाचा प्रारंभ झाला. या ग्रामस्थांची एकी वाखाणण्याजोगी होती. प्रत्येक घरातून २०० रुपये वर्गणी काढून, मुंबईस्थित ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मुंबईत पारंपरिक कार्यक्रम करून गोळा झालेल्या निधीतून या गावाने नदीतील गाळ उपसा करून गावातील पाणीटंचाई दूर केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काेळोशी येथील ग्रामस्थांच्या एकीतून आणि नामच्या माध्यमातून पाझर तलावाचे काम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पच मानायला हवा. नामकडून मशीनरी मोफत पुरविली जाते. फक्त त्यासाठी लागणारा डिझेलचा खर्च त्या गावाला करावा लागतो.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नामच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाल्यानंतर काही गावांमध्ये स्वत: नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते कामांचा प्रारंभ झाला. कोकणातील या कामांमध्ये या दोघांसोबतच मुख्य समन्वयक गणेश थोरात, जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले, कोकण समन्वयक समीर जानवलकर, अविनाश गोखले, राजीव सावंत तसेच नामचे दापोली प्रतिनिधी योगेश पिंपळे, समीर पाटील, लांजाचे प्रकाश सावंत, पाटोळे, गुहागरचे हेमंत चव्हाण, रत्नागिरीचे राजेंद्र चव्हाण, नीलेश मुळ्ये, चिपळूणचे महेंद्र कासेकर, रमण डांगे, राजापूरचे रघुवीर बापट, संगमेश्वरचे रोहित सावंत, भगवत सिंह चुनदावत, खेडचे सुनील आंबरे, अंकुश विचारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
यावर्षी नामच्या संपर्कात असलेल्या संगमेश्वर, आरवली, हरचेरी, सांगवे, मंडणगड, हेदवी, दाभोळे, सिंधुदुर्गातील नांदोसकट्टा तसेच देवळे येथे अपूर्ण राहिलेले काम नामच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राजकारणविरहीत सुरू असलेल्या नामच्या कार्यामुळे कोकणातील अनेक गावे जलसमृद्ध झाली आहेत, होत आहेत
.............................
नाम फाऊंडेशन गावांमध्ये काम करण्यासाठी सदैव तयार आहे. ग्रामस्थांनी राजकारणविरहीत पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे. प्रत्येक ठिकाणी झाडे लावली, तर जमिनीची धूप थांबेल. भविष्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आताच काम करायला हवे.
- समीर जानवलकर, कोकण समन्वयक, नाम फाऊंडेशन