दुर्लक्षामुळे शेतीपूरक उद्योग अडचणीत
By Admin | Published: September 5, 2014 10:11 PM2014-09-05T22:11:06+5:302014-09-05T23:21:25+5:30
जोडव्यवसायाला मदत : कोकणातील पशुधन घटतेय
सुरेश पवार - दस्तुरी -शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसायदेखील पूर्वीपासूनच अत्यंत महत्त्वाचा आहे. पशुपालन कोकणात मोठ्या प्रमाणावर केले जायचे. मात्र, बदलत्या काळात या पशुधनात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे पशुधन कमी होत आहे. कोकणात जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. मात्र, त्यानंतर पाऊस पडत नाही. त्यामुळे चाऱ्याची प्रमुख समस्या निर्माण होते. डिसेंबरपर्यंत चारा पुरतो. मात्र, जानेवारी ते मे महिन्यात जनावरांना चारा मिळत नाही. कोकणामध्ये प्रामुख्याने गाय, बैल, म्हशी, शेळ्या इतर गुरे पाळली जातात. गाई, म्हशी या दूध देणाऱ्या असल्याने त्यांना हिरवागार चारा मिळणे गरजेचे असते. त्याचा परिणाम दुधावर होतो. त्यामुळे दुधासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यातच गाय, म्हैस यांच्या किमतीदेखील प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला ते विकत घेणे परवडत नाही.
कोकणामध्ये उत्पन्नाची साधने अत्यंत कमी आहेत. शेती, पशुपालनाखेरीज क्वचितच कुक्कुटपालन होते. उद्योगधंद्याचे प्रमाण कमी असल्याने खरेतर शेती व पशुपालन मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगही पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे दुधापासून मिळणारे उत्पन्नदेखील अत्यल्प आहे. पर्यायाने पशुपालनाकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. पशुधनामुळे दूध, मांस, खते अशी विविध उत्पादने तयार होतात. मात्र, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, उद्योगांच्या अभावी पशुधनाची घट होतेय. वास्तविक पशुधन वाढून प्रगतीला चालना मिळणे गरजेचे आहे. यातून दूध डेअरी, गांडुळ खतासारखे प्रकल्प विकसित करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे गुरे अधिक तो श्रीमंत. ही पूर्वीची कल्पना आता मागे पडू लागली आहे. मात्र, जनावरांमुळे सुबत्ता वाढते. दूध, खत, बायोगॅस असे अनेक फायदे होतात. त्यामुळे पशुधनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.
कोकणातील शेतीला पूरक असा जोडव्यवसाय सुरू व्हावा, असे प्रयत्न त्या त्यावेळी करण्यात येत असतात. मात्र, सध्या या भागात पशुधनाची अवस्था बिकट झाली असल्याने त्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. तरूणांनी या व्यवसायाकडे वळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.